बचतगटांना चालना : आंध्रप्रदेशच्या धर्तीवर सर्वत्र अंमलबजावणीअमरावती : आता अनेक महिला बचत गट एकत्र करून त्यांचा ‘ग्रामसंघ’ स्थापन करण्यात येणार असून, त्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आंध्रप्रदेशमध्ये असे ‘ग्रामसंघ’ प्रभावी काम करीत असून, त्याच धर्तीवर जिल्ह्यातील योजना अमलात आणली जात आहे. गावातील किमान पाच आणि अधिकाधिक २० महिला बचत गट एकत्र करून त्यांचा ग्रामसंघ स्थापन केला जाईल. तो स्थापनक करण्यासाठी तालुका व्यवस्थापक, समुदाय संसाधन व्यक्ती आवश्यक ते प्रशिक्षण घेतील. एकदा का हा ग्रामसंघ स्थापन झाल्यानंतर बँकेत खाते उघडल्यानंतर मग तो अधिकृतपणे सुरू झाल्याचे मानले जाईल. हा ग्रामसंघ आपल्या सर्व बचत गटातील सदस्यांना सामाजिक शासकीय योजनांचा लाभ तसेच हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार मिळवून देणे, मजूरप्रधान विशेषत: महिला, अपंग यांना करता येण्याजोग्या गावातील व परिसरातील कामांची यादी तयार करून ती ग्रामपंचायतींना पाठविणे. ती मंजूर व्हावी, यासाठी पाठपुरावा करणे, मजुरांना योग्य मजुरी मिळते का यावर देखरेख करणे, ग्रामपंचायत आणि मजूर सदस्य यांची दोन महिन्यांतून एकदा बैठक घेण्याचे काम ग्रामसंघ करणार आहे. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी यांसारख्या शासनाच्या निराधार अपंग, विधवा परित्यक्ता यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ संबंधितांना होतो की नाही, याची देखरेख हा ग्रामसंघ करणार आहे. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा ग्रामसंघाकडून केला जाईल. दारिद्ररेषेखालील ग्रामस्थांना स्वच्छ धान्य दुकानातून नीट सेवा मिळते का, याबाबत ही देखरेख ठेवून समन्वय ठेवला जाणार आहे. प्रत्येक ग्रामसभेत सहभाग वार्षिक अंदाजपत्रकाची माहिती, महिला व बालविकास योजनेसाठी निधी खर्च होतो की नाही, याबाबत माहिती होणे ही कामे हा ग्रामसंघ करीत ग्रामसंघाची सर्वसाधारण सभा वर्षातून तीनवेळा होणे आवश्यक असून एक वार्षिक सभा होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
महिला बचतगटांचे ग्रामसंघ होणार कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2017 12:44 AM