अमरावती : घरकूल योजनेंतर्गत प्रपत्र ड मध्ये सुटलेल्या परंतु घरकुलाकरिता पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी सादर करण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सीईओंच्या स्वाक्षरीने बीडीओमार्फत ग्रामसेवकांना ५ मे रोजी दिले आहे. मात्र सदर यादी एक नव्हे तर तीनवेळा संबंधित विभागाला सादर केली आहे. त्यामुळे आता पुन्हा ही यादी सादर करण्यास ग्रामसेवकांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या या पत्राला नेमका काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसईसीसी सर्वेक्षणानुसार जीपीएल लिस्टप्रमाणे घरकुलाच्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी प्रपत्र अ मध्ये तयार करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामसभाव्दारे घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांच्या नावाचा समावेश करून पीडब्ल्यूएल प्रपत्र ब कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. प्रपत्र अ मधील घरकुलाकरिता अपात्र लाभार्थ्यांचा समावेश प्रपत्र क मध्ये करून एसईसीसी सर्वेक्षणानुसार लाभार्थी यादी अंतिम करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शासनाने घरकुलाकरिता पात्र असलेल्या परंतु प्रपत्र अ मध्ये समाविष्ट नसलेल्या गरजू लाभार्थ्यांकरिता अर्थातच घरकुलाकरिता पात्र परंतु सुटलेल्या लाभार्थ्याकरिता पपत्र ड तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार ग्रामसभेच्या शिफारसीप्रमाणे जिल्ह्यातील १७४१४३ एवढे कुटुंबाचा व ३२८८८९ घरातील सदस्याचा समावेश प्रपत्र ड यादीमध्ये करण्यात आला आहे. परंतु बहुतांश गावांत घरकुलाकरिता पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांचा समावेश प्रपत्र ड मध्ये केलेला नाही, अशा पात्र कुटुंबाची यादी डीआरडीएने दिलेल्या गोषवाऱ्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतकडून विस्तृत माहितीसह येत्या १५ दिवसात ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत मासिक सभेच्या शिफारसीनुसार सादर करण्याचे आदेश सीईओ अविश्यांत पंडा यांनी बीडीओमार्फत ग्रामसेवकांना दिले. त्यानुसार घरकुलाच्या पात्र याद्या प्रपत्र ब मधून सुटलेल्या सर्व लोकांचे रीतसर अर्ज घेऊन ग्रामसभेसमोर ठेवून त्याच्या याद्या आतापर्यंत तीनवेळा प्रशासनाला सादर केल्या आहेत. त्या याद्या ऑनलाइन झालेल्या आहेत. त्यापैकी काही लोकांनी रमाई आवास योजनेतून लाभसुध्दा मिळाले आहे. परंतु अन्य घटकांतील लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. तरीही प्रशासन पुन्हा याद्या मागवून ग्रामसेवकांना वेठीस धरत असल्याचा आरोप ग्रामसेवकांमधून होत आहे.
बॉक्स
संघर्ष पेटण्याची चिन्हे
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने २३ एप्रिलच्या झेडपी स्थायी समिती सभेतील अध्यक्षांच्या निर्देशाचा हवाला देत ग्रामसेवकांना प्रपत्र ड मध्ये सुटलेल्या परंतु घरकुलाकरिता पात्र लाभार्थ्याची यादी मागविली आहे. याकरिता सीईओंच्या स्वाक्षरीने १५ दिवसांचा अवधी दिला आहे. मात्र ग्रामसेवकांनी ही यादी वारंवार सादर करण्यास नकार दर्शविल्याने या विषयावर प्रशासन व ग्रामसेवक संवर्गात संघर्ष पेटण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.