साखळी नदीपात्रातील पाईपमध्ये अडकले, नातेवाइकांचा खटाटोप व्यर्थ
मंगरूळ चव्हाळा (अमरावती) : आजीच्या दशक्रिया विधीसाठी खानापूर गवळी (ता. नांदगाव खंडेश्वर) येथून मंगरूळ चव्हाळानजीक साखळी नदीतीरी गेलेल्या दोन नातवांचा पात्रात टाकलेल्या पाईपमध्ये अडकून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाइकांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले.
मनीष दिलीप टोनपे (२३) व ईश्वर रामराव टोनपे (२५, दोघेही रा. खानापूर गवळी) अशी मृतांची नावे आहेत. मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या गावात ममताबाई टोनपे (७५) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या दशक्रिया विधीकरिता शनिवारी कुटुंबीय गावापासून आठ किमी अंतरावरील मौजे अजुर्नपूर येथील साखळी नदीकाठी ऋषी महाराज मंदिरात गेले होते. या साखळी नदीवर निम्न साखळी हे धरण बांधले आहे. या नदीचे पात्र पार करण्यासाठी काही अंतरावर पायली टाकण्यात आली आहे. बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे पाणी नदीपात्रातून वाहत आहे. त्यामुळे धरणाखाली नदीपात्रात भोवरा तयार झाला आहे. नदीकाठी आलेले मनीष व ईश्वर यांनी पोहण्यासाठी उडी घेतली. मात्र, प्रवाह तीव्र असल्याने ते पुलाच्या सात फुटांच्या गोल पायलीत अडकले. हे लक्षात येताच पूजेला बसलेल्या भाऊ, वडील व नातेवाइकांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी २० मिनिटांपर्यंत केलेले प्रयत्न फोल ठरले. दोघांचे पाय पायलीत घट्ट फसल्याने त्यांना पाण्याच्या वर येता आले नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
आईच्या मृत्यूचे दु:ख शमलेले नसताना रामराव टोनपे व दिलीप टोनपे यांना मुलाच्या मृत्यूचे दु:ख सहन करावे लागले. याप्रकरणी त्यांनी धरणाच्या अर्धवट बांधणीमुळे ही घटना घडल्याचा आक्रोश व्यक्त केला.
सहायक पोलीस निरीक्षक पडघान यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांची कार्यवाही सुरू होती.