अमरावती : दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी शाळांमधे आजी-आजोबा दिवस साजरा करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. यंदा १० सप्टेंबर रोजी आजी-आजोबा दिवस राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या १ हजार ५८० शाळांमध्ये एकाच दिवशी आजी-आजोबा दिन साजरा केल्यानंतर कार्यालयीन दिवशी जिल्हास्तरावरही हा उपक्रम राबविला जाईल.
शाळेतील अनुभवास व आजी-आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगूजमधून मिळणारी माहिती, गोष्टी पाल्यांच्या जडणघडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी-आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पागोष्टी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख व्हावी, यासाठी आजी-आजोबा दिवस शाळेत साजरा केला जाणार आहे.
तालुकानिहाय झेडपी शाळा संख्या
अचलपूर १२८, अमरावती १०८, मनपा क्षेत्र ०४, अंजनगाव सुर्जी ८७, भातकुली ११०, चांदूर बाजार १२२, चांदूर रेल्वे ६८, चिखलदरा १६३, दर्यापूर १२९, धामणगाव रेल्वे ८३, धारणी १७०, मोर्शी १०२, नांदगाव खंडेश्वर १२४, तिवसा ७६, वरूड १०६