अमरावती : आजीचा खून करणाऱ्या नातवाला आजीवन कारावास, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ एस. एस. अडकर यांनी १९ जानेवारी रोजी हा निर्णय दिला.
स्वप्निल ऊर्फ संतोष तुळशीराम कोडापे (३०, बांदेकर प्लॉट, राठीनगर, अमरावती) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. २७ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास राठीनगरातील बोरीकर प्लॉटमधील आशा कोडापे यांच्या घरी तो खून करण्यात आला होता. शांताबाई चांदेकर (७५) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मृताची मुलगी व आरोपीची मावशी असलेल्या महिलेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. घटनेच्या पूर्वीपासून मृतक ही आशा कोडापे या मुलीसोबत राहत होती. तेथे तिच्यासमवेत मुलगी, जावई व आरोपी राहत होता. घटनेच्या एक दोन दिवसांपूर्वीपासून आरोपी हा फिर्यादी व तिच्या बहिणीला अर्थात त्याच्या आईला गाडी घेण्याकरीता पैसे मागत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास ती घटना घडली. घरात आरोपी स्वप्निल व शांताबाई हे दोघेच असून, घराचे दार आतून बंद आहे, अशी माहिती फिर्यादी महिलेला मिळाली. त्यावरून फिर्यादी महिला तिच्या पतीसह आशा कोडापे यांच्या घरी गेले. स्वप्निलला आवाज देताच तो दार उघडून पळून गेला. तर शांताबाई या जखमी अवस्थेत पडून होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
आरोपीचे स्पष्टीकरण फेटाळले
जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी पाच साक्षीदार तपासले. मुख्यत्वे आरोपी व मृतक हे दोघेच घरात होते. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणीही घरी नव्हते, इतर कुणास घरात शिरण्यास वाव नव्हता, अशा परिस्थितीत घराच्या आत काय घडले, याचे स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी सर्वस्वी आरोपीची आहे. आरोपीने त्याबाबत ग्राह्य स्पष्टीकरण दिले नाही, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. तो ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून बाबाराव मेश्राम व नापोकॉ अरुण हटवार यांनी काम पाहिले.