अर्थमंत्र्यांची घोेषणा : जिल्हा वार्षिक योजनेची बैठकअमरावती : जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६ सर्व साधारण योजना प्रारुप आराखड्याची बैठक गुरुवारी येथे पार पडली. या बैठकीत राज्याचे अर्थ, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी ७९ कोटीचा वाढीव निधी मंजूर केला. गत वर्षी जिल्हा नियोजन समितीला १७५ कोटी रुपयाला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे आता डीपीसीचे बजेट २५४ कोटीवर पोहचले आहे. येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची बैठक पार पडली. यावेळी मंचावर पालकमंत्री प्रविण पोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गत वर्षी डीपीसीचा खर्चाचा आराखडा सादर केला. जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, पशु संवर्धन, वन विभाग, रस्ते, पर्यटन विकास, जलसंधारण, दलित वस्त्यांचा विकास, मेळघाटात विजेची समस्या, पाणी पुरवठा, विमानतळाचा विकास, रुग्णालयात मूलभूत सोई सुविधा पुरविण्यासाठी डिपीसीत ७९ कोटी २ लाख ६१ हजार रुपयाचा वाढीव निधी मंजूर करण्याची बाब उपस्थित केली. दरम्यान आमदारांनी मतदार संघाची समस्या आणि विकास कामे सुचवितांना काही बाबींना प्राधान्य देण्याची विनंती केली. लोक प्रतिनिधी, अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी ७९ कोटी रुपयांचा वाढीव निधीला मंजूरी दिली. दरम्यान सिंचन विभागाचे गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना नोटीस बजाविण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
जिल्ह्यात ७९ कोटींचा वाढीव निधी मंजूर
By admin | Published: January 29, 2015 10:58 PM