ठळक मुद्देमोवाड : २७ वर्षांनंतरही आप्तांच्या आठवणीने डोळ्यांच्या कडा होतात ओल्या
गजानन
नानोटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसला : मोवाड महापुराने ३० जुलै १९९१ रोजी धुवून नेले, तर वरूड तालुक्यातदेखील अनेक गावे पाण्याखाली आली होती. कुणी आई, बहीण, भाऊ, मुलगा, तर कुणी बाप गमावला. कुठे अख्खे कुटुंब वाहून गेले. २७ वर्षांनंतरही तो दिवस आठवला की, अनेकांच्या डोळ्यांना धारा लागतात.मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील मोवाड हे वर्धा नदीच्या तीरावरील गाव. १९९१ मध्ये ३० जुलैच्या मध्यरात्री एकाएकी मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला महापूर आला आणि हजारो लोकांना जलसमाधी मिळाली. घरे नेस्तनाबूत झाली. साहित्य पाण्यात वाहून गेले. बँका, सरकारी कार्यालयेसुद्धा कागदपत्रासह स्वाहा झाली होती. मृतदेहांचा सडा पडलेला होता. यात आई, बहिणी, बाप, मुलगा, भावकीतील आपला कोण, याचा शोध आणि आक्रोश सर्वत्र होता.मोवाड वगळता अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या वरूड तालुक्यालासुद्धा महापुराचा फटका बसला. वरूड, गणेशपूर, पुसला, लिंगा, आमनेर, मोर्शी (खुर्द) पोरगव्हाण, देऊतवाडा, घोराड, एकदरासह या नदीतीरावरील अनेक गावांचे गायरान झाले. यातून वाचलेल्यांना दरवर्षी जुलै महिन्यात धडकी भरते. आक्रोश, जीव वाचविण्याची धडपड आणि आप्तांच्या शोधासाठी पायपीट सर्व डोळ्यांपुढे तरळून जाते.ती काळरात्र अजूनही अंगावर शहारे आणते. अंगावर असलेले कपडे घेऊनच वाट मिळेल तिकडे लोक धावत होते. आम्हीसुद्धा आमच्या परीने होईल ती मदत मोवाडवासीयांना पोहचवून माणुसकीचा संदेश दिला होता.- रमेश श्रीराव,माजी सरपंच, पुसला