नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: किलबिलाट करणारे पक्षी मोबाईल टॉवरमधून होणारा किरणोत्सर्ग वा अन्य कारणांनी नामशेष होत असताना परतवाडाजवळच्या लाखनवाडी येथे ३० वर्षांपासून हिरव्यागार वडाच्या झाडावर पांढ-या शुभ्र बगळ्यांची शाळा भरत आहे. याच झाडावर त्यांचा विसावा आहे. पहाट झाली की, आकाशात भरारी घेणारे हे पक्षी सायंकाळी ६ वाजतापासून परत यायला सुरुवात होते आणि हिरवेगार असलेले हे झाड क्षणार्धात पांढरे शुभ्र होते.
लाखनवाडी येथे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गुणवंत बाबांचे समाधीस्थळ आहे. या परिसराला लागूनच एक भव्य वडाचे झाड आहे. या उंच झाडावर बगळे विसावा घेतात. संपूर्ण झाडावर हे बगळे रोज सायंकाळी ६ वाजता डेरेदाखल व्हायला सुरुवात होते. दररोज पहाटे ५ वाजतापासून शेकडोंच्या संख्येत असलेले बगळे उंच भरारी घेत आकाशात चहू दिशेने विहार करतात. दिवसभर अन्न पाण्याच्या शोधात गेलेले हे पक्षी सायंकाळी मात्र न चुकता आपल्या घरट्यात परत येतात. लाखनवाडी येथील गुणवंत बाबांच्या समाधी मंदिर दर्शनासाठी सोमवार, गुरुवार आणि रविवार अशा तीन दिवस शेकडो भक्त नतमस्तक होण्यासाठी येतात. मात्र, या बगळ्यांवर माणसांच्या गर्दीचा कुठलाच परिणाम जाणवत नाही.चिल्यापिल्यांची खोडकर मस्तीशेकडो बगळ्यांचा डेरा असल्याने येथेच ते अंडी घालून पिल्लांना जन्म देतात. लहान पिल्ले उडण्याच्या करीत असलेले प्रयत्न आणि त्यांची खोडकर मस्ती येथे येणा-या हजारो भक्तांचे लक्ष वेधणारे ठरत आहे. अनेक वर्षांपासून वडाच्या झाडावर या बगळ्यांचा डेरा असल्याचे लाखनवाडी येथील वयोवृद्ध पंजाबराव वैराळे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.