अमरावती : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना व शिक्षकांना शैक्षणिक आधार देण्यासाठी गट शहर समूह साधन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या केंद्राचे कामकाज जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या नियंत्रणात चालविण्यात येत होते. मात्र आता शहर व ग्रामीण भागातील सर्वशिक्षा अभियानांतर्गत गट साधन केंद्राचे कामकाज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत चालविण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने २५ सष्टेंबर रोजी सर्व जिल्हा परिषदांना आदेश दिले आहेत. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना व शिक्षकांना शैक्षणिक आधार देण्यासाठी गट शहर समूह साधन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. यासाठी तालुका स्तरावर गट साधन केंद्र व महापालिकांमध्ये शहर साधन केंद्राची निर्मिती या कामासाठी केली होती. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आटीई अॅक्ट २००९) ची अंमलबजावणी राज्यभरात १ एप्रिल २०१० पासून सुरू झालेली आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गटसाधन, शहरसाधन केंद्राची व पदाची पुनर्रचना केली. ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे ३५१ ठिकाणी गटसाधन केंद्र व शहरी भागामध्ये १० ते १५ समूह साधन केंद्रांसाठी एक याप्रमाणे ५६ शहरसाधन केंद्र अमरावतीसह राज्यभरातील जिल्हा परिषद व महापालिकांमध्ये कार्यरत आहेत. सुधारित निकषाच्या आधारे केंद्र शासनाने सन २०१४/ २०१५ च्या सर्वशिक्षा अभियान वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक ३५१ गटसाधन केंद्र व शहरसाधन केंद्रासाठी आवश्यक तरतूद केली आहे. या गट /शहरसाधन केंद्रात प्रत्येक विषयाकरिता एक साधन व्यक्ती असे सहा विषय साधन व्यक्ती आणि समावेशित शिक्षणांतर्गत २ विषय साधन व्यक्तीच्या कार्यरत पदांना मंजुरी देण्यात आली आहे. वर्ग १ ते ८ करिता सामान्यत: मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, (इतिहास व भूगोल) या विषया करिता विषयतज्ज्ञांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. सन २०१४/ २०१५ जिल्हा परिषद व महापालिकांमध्ये कंत्राटी पध्दतीने २०३१ विषय साधन व्यक्ती व ८१४ समावेशित शिक्षणाचे विषय साधन व्यक्तीत कार्यरत आहेत. राज्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची निर्मिती ही प्रामुख्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्यादुष्टीने शाळा व शिक्षणाच्या समृध्दीसाठी केली आहे. गट/ शहरसाधन केंद्राचे कार्य हे शैक्षणिक कामकाजाशी संबंधित असल्याने त्याच्या कार्याच्या संनियंत्रणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाकडे देऊन त्यांच्याव्दारा सातत्याने मार्गदर्शन देण्यासाठी याबाबतच्या शासन निर्णयानुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत गट/ शहरसाधन केंद्र शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी संलग्न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे गट/शहरसाधन केंद्राचे सक्षमीकरण व त्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी समन्वयन करणे सोईचे होणार आहे. त्यादुष्टीने गट/ शहरसाधन केंद्राचा प्रभावी उपयोग करून घेण्यासाठी राज्यभरातील ४०७ गट/ शहरसाधन केंद्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस संलग्न करण्यात आले आहेत.
गट, शहर साधन कें द्र शिक्षण, प्रशिक्षण संस्थेकडे
By admin | Published: October 16, 2014 11:18 PM