अमरावती : राज्यातील शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांची पदे निश्चित करण्यासाठीची संचमान्यता करण्यात येणार आहे. त्यामुळे आधार नोंदणी अद्यावतीकरणाचे काम अपूर्ण राहिल्यास कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होतील, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालक यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करण्याबाबत बरेचदा आदेश बजावूनही अनेक विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या बोटांच्या प्रशासन आधार नोंदणी करणे काही शाळांना पालकांना शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या अधिपत्याखालील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक नोंदणीचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी आधार नोंदणी होऊनही आधार क्रमांक न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त करून सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची पदे निश्चित करण्याची संचमान्यता केली जाते. मात्र, आता आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरच संचमान्यता दिली जाणार आहे. त्यामुळे आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिले असल्यास कमी भासणाऱ्या पटसंख्यामुळे शिक्षकांची पदे संचमान्यता कमी होती. त्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या परिस्थितीत आधार क्रमांक नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण न करणाऱ्या शालेय व्यवस्थापनास जबाबदार धरले राहणार आहे. अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.