चारशे हेक्टरातील बियाणे गेले वाहून
धामणगाव रेल्वे : पावसाळ्याच्या आठ ते पंधरा दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या वाढोणा शिवारात गुरुवारी कोसळलेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने जलसागर निर्माण केला. तब्बल चारशे हेक्टरमध्ये पेरलेले बियाणे पूर्णतः वाहून गेले.
तालुक्यातील दोन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या वाढोणा येथे मान्सूनच्या पहिल्या पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. या गावाचा इतिहास पाहता, येथे शंभर टक्के मान्सूनपूर्व पेरणी होते. १ जूनपासून सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांची पेरणी केली. मात्र, गुरुवारी वाढोणा हे गाव पावसाने पूर्णत: जलमय झाले. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पेरलेले बियाणे पूर्णतः वाहून गेले.
वाढोणा ग्रामपंचायतीचे शिल्पकार पंकज गायकवाड यांनी स्वतः गावात पोहोचून शेताची पाहणी केली. समृद्धी प्रकल्पामुळे सर्वाधिक शेतजमिनीचे नुकसान झाले. शेंदूरजना खुर्द येथील शेतकरी संदीप रहाटे आणि इतर शेतकऱ्यांचे पावसामुळे आणि मोती कोळसा नदीला आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तालुका प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करावे, अशी मागणी पंकज गायकवाड यांनी केली आहे.