लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : केंद्र शासनाने २० टक्के आयात शुल्क लावल्यावर सोयाबीनसह सर्वच तेलांच्या दरात २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ४८९२ रुपये क्विंटल हमीभाव असताना मार्केटमध्ये सोयाबीनला ३८०० ते ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणे कठीण आहे.
बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. सद्यस्थितीत १३ ते १४ हजार सोयाबीनच्या पोत्यांची आवक होत आहे. नाफेडमध्ये १२ टक्के आर्द्रतेचा निकष आहे व दोन महिने चुकारे मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर अडचणीत सापडलेले शेतकरी सोयाबीन विक्रीला आणत आहेत. व्यापाऱ्यांद्वारा सोयाबीनची मातीमोलभावाने खरेदी होत आहे.
सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढला आहे. पेरणीपूर्व मशागत ते काढणीपर्यंत एकरी किमान २० हजार रुपयांचा खर्च येतो. यंदा उतारा घटल्याने शेतकऱ्यांच्या हाती पोतभर सोयाबीनही उरत नाही. सोयाबीनला वर्षभर हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे खरिपात सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीन संकटात आले आहे. सबब, शेतकरी हवालदिल झाला आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची कोंडी आर्थिक अडचणीतील शेतकरी दिवाळीपूर्वी सोयाबीन विक्रीला आणत असताना व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांची कोंडी करण्यात येत आहे. सोयाबीन साठवणुकीला पुरेशी जागा नाही, शेतमजुरांचे चुकारे राहिले आहेत. दहा दिवसांवर दिवाळीचा सण आलेला आहे.
सोयाबीनचे बाजारभाव (रु/क्विं) ०९ ऑक्टोबर ३६०० ते ४२००११ ऑक्टोबर ३९५० ते ४३९९ १४ ऑक्टोबर ३८०० ते ४३२५२६ ऑक्टोबर ३८०० ते ४३००१८ ऑक्टोबर ३८०० ते ४११२
"नवीन सोयाबीनमध्ये आर्द्रता जास्त आहे. त्यामुळे कमी भाव मिळत आहे. नाफेडमध्ये असे सोयाबीन घेतले जात नाही. त्यामुळे दोन्ही प्रकारांत शेतकऱ्यांची कोंडी होत आहे." - अशोक आवारे, शेतकरी