मोर्शी (अमरावती) : लगतच्या दापोरी येथील शेतात रखवालदार म्हणून काम करणाऱ्या युवकाने त्याच्या सोबतीला असलेल्या महिलेच्या डोक्यावर प्रहार करून तिला ठार केले. यानंतर त्यानेसुद्धा विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ८ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली.
पोलीस सूत्रांनुसार, दापोरी येथील शेतकरी दामोदर विघे यांचे शेत गावालगत दापोरी शिवारात आहे. त्यांच्या शेतावर मध्यप्रदेशातील कोलारी (ता. आठनेर) या गावातील राजू धुर्वे (३५) वर्षे हा युवक जवळपास एक वर्षापासून रखवालदार म्हणून कार्यरत होता. पंधरा दिवसांपूर्वी त्याने ३० वर्षीय महिला व तिच्यासोबत असलेल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत काम करायला शेतात आणले होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणांवरून बाचाबाची झाली. रागाच्या भरात राजू धुर्वे याने या महिलेच्या डोक्यावर दांड्याने प्रहार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून त्यानेसुद्धा मोठ्या प्रमाणात विषारी द्रव्य प्राशन केले, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेश नवघरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रूपेश वाळके यांनी विषारी औषध प्राशन करणारा युवक वाचावा यादृष्टीने त्याला व मृत महिलेला खासगी वाहनात टाकून मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मृत महिलेचे नाव सुनीता असल्याचे पुढे आले आहे. तथापि, राजू धुर्वेशी तिचा संबंध, तिचे संपूर्ण नाव आणि कुठली, याचा पत्ता अद्याप लागू शकला नाही. त्यादृष्टीने मोर्शी पोलिसांनी तपास आरंभीला आहे.
तीन वर्षीय मुलीला शेतमालक दामोदर विघे यांनी आपल्याकडे ठेवले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, ठाणेदार श्रीराम लांबाडे, पोलीस उपनिरीक्षक विजय लेव्हलकर, भागवतकर यांच्यासह त्यांच्या सहकारी चमूने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहेत.