बदलीवर शिक्कामोर्तब : नागरिकांमध्ये संताप, सर्वपक्षीय नगरसेवकांची एकजूट अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा अखेर राजकीय बळी देण्यात आला. होणार होणार, अशी चर्चा असलेल्या बदलीवर मंत्रालयात गुरुवारी सायंकाळी शिक्कामोर्तब झाले. वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारीपदी गुडेवारांचे स्थानांतर करण्यात आले असून त्यांच्या जागी हेमंत पवार हे रुजू होण्याची शक्यता आहे. करर्तव्यकठोर आणि प्रामाणिक प्रशासकीय कार्यशैलीने बड्याबड्या राजकारण्यांची भंबेरी उडविणारे गुडेवार अमरावतीतील लोकप्रतिनिधींना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी दिसू लागले होते. गुडेवार नकोच, असा हट्टच स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे धरला होता. गुडेवार बदलणार नसतील तर राजीनामा देऊ, अशी धमकीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती. स्वपक्षातूनच असा बाका प्रसंग उभा ठाकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान तुकवावी लागली. सायंकाळी ६.२० च्या सुमारास गुडेवारांच्या बदली प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही झाली. क्षणात बातमी अमरावतीत धडकली. कर्णोपकर्णी वार्ता पोहचू लागली. फोन खणाणू लागले. प्रामाणिकतेचा आग्रह धरणारी मंडळी गुडेवारांच्या पाठीशी एकजूट झाली. पत्रपरिषदा, निवेदने, प्रतिक्रिया, असा क्रम सुरु झाला. तिकडे गुडेवारांनाही वार्ता कळली. परंतु आदेश महापालिका कार्यालयात धडकले नव्हते. सायंकाळी ७ च्या सुमारास गुडेवारांनी कार्यालय सोडले नि निवासस्थान गाठले. महापालिका परिसर उशीरापर्यंत पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी, कंत्राटदार आणि संबंधितांच्या गर्दीने फुलू लागला. गुडेवारांची बदली थांबविण्यासाठी सारेच नगरसेवक एकत्र आले. अनेक सामाजिक मंडळी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. (प्रतिनिधी)शुक्रवारी शहर ठप्पचंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्यासाठी विविध संघटना आणि राजकीय पक्ष सरसावले आहेत. एकत्रितपणे सर्वांनी शुक्रवारी अमरावती शहर बंदची हाक दिली आहे. आरपीआय, शिवसेना, युवा स्वाभिमान, कर्मचारी संघटना, सर्वपक्षीय नगरसेवक, अमरावती कृती समिती, कंत्राटदार, विद्यार्थी, सामान्य नागरिक आदींचा या बदली निषेध आंदोलनात सहभाग असेल. डॉ. राजेंद्र गवई, संजय बंड, संजय खोडके, चंद्रकुमार जाजोदीया, रवी राणा, प्रदीप बाजड यांनीही या बदलीविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. अमरावतीबाहेर असलेली शहरातील काही मंडळी गुडेवारांच्या बदलीची वार्ता समजताच तातडीने अमरावतीकडे सरासवली आहे. शुक्रवारी सकाळी विविध ठिकाणी होणाऱ्या बैठकांची अंतिम रुपरेषा आंदोलनाचे निश्चित स्वरुप ठरवेल. राजकमल चौकात सकाळी १० वाजताच्या सुमारास सर्वपक्षीय, विविध सामाजिक संघटना एकत्रित येतील. आंदोलनाची तीव्रता आणि स्वरुप तेथेच ठरविले जाईल. बदली वार्ता समजताच शहरातील विविध मोहल्ल्यांमधून स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना नागरिक बदली रद्द करण्याची मागणी रेटतील.
गुडेवारांचा राजकीय बळी, बंदची हाक !
By admin | Published: May 13, 2016 12:02 AM