बडनेरा (अमरावती) :अमरावती ते अकोला दरम्यान रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला शुक्रवारी वाजतगाजत सुरुवात झाली. यामुळे महामार्गावर पहाटे शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीचे कामातील त्रुटींकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे पहिल्याच दिवशी निदर्शनाला आले.
सुमारे १० वर्षांपासून खोदून ठेवलेला तसेच अर्धवट होऊन रखडलेल्या अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला शुक्रवारी पुन्हा सुरुवात झाली. लोणी ते मूर्तिजापूर दरम्यान सलग पाच दिवस डांबरी रस्त्याचे काम होणार आहे. ज्या कंपनीला रस्त्याचे कंत्राट मिळाले, त्या राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. या कंपनीने या कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याचा दावा केला आहे. १०८ तासांत ७५ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यासाठी कंपनीचे तज्ज्ञ कामावर लक्ष ठेवून आहेत. विशेषत: कामाच्या दर्जाची प्रयोगशाळेतून तपासणीही केली जाणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यासाठी स्वतंत्रपणे ‘वाॅर रूम’ तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, ३ जून रोजी लोणी गावानजीक महामार्गावर वाजतगाजत कामाला सुरूवात झाली, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बराच वेळपर्यंत ही वाहने अडकून पडली. दुसऱ्या बाजूने रस्त्याचे काम सुरू असतानाच त्यावरून वाहनांची वर्दळ कायम होती. त्यामुळे पुढे पाठ मागे सपाट, असा हा प्रकार अनेकांनी अनुभवला. याकडे मात्र कंपनी अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष झाले होते. त्याचप्रमाणे कंपनीची बरीच वाहने निर्माणाधिन रस्त्यावरून धावली. अकोला महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात नियोजनाचा विसर पडल्याने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एकाच मार्गावरून दोन्ही बाजूच्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.
लोणी गावाच्या प्रवेशद्वारापुढेच उड्डाणपुलाची संरचना
गेल्या तीन आठवड्यांपासून लोणी गावाच्या प्रवेशद्वारावरच लोखंडी सळाखीची संरचना उभी करण्यात आली आहे. येथे उड्डाणपूल होणार असल्याचे समजते. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले होते. बडनेरा-कारंजा, बडनेरा ते अकोला तसेच बडनेरा ते धनज मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना या संरचनेमुळे व त्यापूर्वी उभारण्यात आलेल्या अवाढव्य गतिरोधकामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.