अमित कांडलकर लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : मोजक्या साधकांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी ४.५८ वाजता गुरुकुंजात हृदयस्थ गुरुमाउलीला मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी पर्वातील या महत्त्वाच्या सोहळ्याला यंदा कोरोनामुळे गर्दी टाळण्यात आली. एकीकडे समाधीस्थळी मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत मौन श्रद्धांजली वाहिली जात असताना, गुरुकुंज मोझरी गावात चौक, मोहल्ला आणि घरासमोरच्या मोकळ्या जागेत शेकडो गुरुदेवभक्त नतमस्तक झाले. कोरोनामुळे गुरुकुंज आश्रमात जाऊ न शकलेले आणि बाहेरगावाहून आलेले शेकडो जण स्थानिकांनी खुल्या जागेत केलेल्या व्यवस्थेत सहभागी झाले. गुरुवारी या सोहळ्यानिमित्त गुरुकुंजातील प्रत्येक घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या. कोरोनाच्या सावटातही गुरुदेवभक्तांचा आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. ‘श्रीगुरुदेव की जय हो“ असा घोष करीत टाळ-मृदंगाच्या गजरात, भगवी टोपी परिधान करून सर्वधर्म समभावाचे प्रतीक गुरुकुंजात शेकडो जण दाखल झाले. मुख्य कार्यक्रमाला ३.३० वाजता ‘गुरुदेव हमारा प्यारा, है जीवन का उजियारा’ या प्रार्थनागीताने सुरुवात झाली.
गुरुकुंज मोझरीत शिस्तबद्धतेचे प्रदर्शन
अमरावती : ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी शिस्तबद्ध रीतीने गुरुदेवभक्त, साधकांनी महासमाधी स्थळाच्या दिशेने दोन्ही हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी ‘ऐ भारत के प्यारे भगवन। सुविचार से मुझको चलने दे। मनमंदिर के मेरे सारे। स्फूर्तिके रंग बदल दे।’ हे भजन व ‘चलाना हमें नाम गुरुका चलाना।’ व ‘राष्ट्रसंता जगतगुरु कृपावंता’ ही सामूहिक आरती करण्यात आली. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, खिश्चन, पारशी या सर्व धर्मांच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूंकडून झाल्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला तसेच यावेळी भारतीय लष्करातील शहीद झालेल्या जवानांना व कोविड महामारीशी लढा देत असतांना मृत्युमुखी पडलेल्या कोविड योद्धांनासुद्धा यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रमाचे नियोजन अध्यात्म विभागाचे प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले. संगीत संयोजन नरेंद्र कडवे यांनी केले.
पहिल्यांदाच चुकला सोहळाकोरोनाकाळात अनेकांचा यंदा पहिल्यांदा मौन श्रद्धांजली अर्पण करण्याचा सोहळा चुकला. प्रशासकीय आदेशामुळे अनेक ग्रामस्थांनीच महासमाधी परिसराचे दुरून दर्शन घेऊन धन्यता मानली. गुरुदेवनगर व मोझरीवासीयांना राज्यभरातून येणारे भाविक व पालख्यांचे आदरातिथ्य करता आले नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांवर आधारीत विविध आकर्षक देखाव्यांची निर्मिती करता आली नाही. गुरुकुंजात येऊ न शकल्याने लाखो गुरुदेवभक्तांनी घरीच राहून गुरुमाउलीला श्रद्धांजली अर्पण केली.