अमरावती : कधी सुरू होणार आहेत, असा प्रश्न सध्या ग्रामीण भागात पालक आपल्या पाल्यांचा गुरुवर्यांना विचारताना दिसून येत आहेत. मागील वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन आणि अनलॉक ही परिस्थिती चालूच आहे. आता पुन्हा शासनाने १५ जूनपर्यंत काही शिथिलता देत लॉकडाऊन कायम केले आहे. मात्र, दरवर्षी १५ जून व २६ जूनपासून शाळेची घंटा वाजत असते. परंतु सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन कायम केल्याने शाळा ऑनलाईनच सुरू होतील. हे जवळपास निश्चित झाले आहे.
शिक्षण ऑनलाईन की, ऑफलाईन हा सध्या चर्चेचा विषय आहे. मात्र शासनाने लॉकडाऊन कायम केल्याने शाळा ऑनलाईनचा मार्ग मोकळा झाल्याचे सध्यातरी दिसत आहे.
आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धोका लहानबालकांवर वर्तवल्यामुळे मुले आणि पालकांचे मनोधैर्य टिकवणे हेही महत्त्वाचे आहे. दुसऱ्या लाटेचा आलेख ओसरत असला तरी कोणताही धोकान पत्करता शासनाने शाळा ऑनलाईनच सुरू होतील, असे स्पष्ट संकेत लॉकडाऊन वाढविल्याने दिले आहेत. शाळा सुरू करून शिकणाऱ्या मुलांना केव्हा शाळेत बोलवायचे, हे शिक्षण क्षेत्रात फार मोठे आव्हान येणाऱ्या दिवसात असणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला बोटावर मोजण्याइतके दिवस बाकी असताना सध्याची परिस्थिती पाहता सलग दुसऱ्या वर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार आहे. कारण विद्यार्थ्यांना अजूनही शाळा प्रवेश बंदी कायम आहे. त्यामुळे शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी बिनधास्त असले तरी त्यांच्या भविष्याबाबत पालक अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे शिक्षणाची अनिश्चितता दिसत आहे. यामुळे पालक दुहेरी कात्रीत सापडले आहे. शहरी भागात ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीये.ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. त्यांना एखाद्या वेळेस कनेक्टिव्हिटी नसणे, इंटरनेटच्या सुविधांचा अभाव,नेटपाॅक मारण्या करीता पैसे नसने इतर साधनांचा तुटवडा त्यामुळे ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षण कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.
कोट
कोरोनामुळे शाळा कधी सुरु होतील हे अनिश्चित आहे. मुले मुली घरच्या घरी खोडकरपणा करण्यात, खेळण्यात इतके बेभान झाले आहेत की, ते पालकांचे ऐकत नाहीये. त्यामुळे त्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली आहे.
- संतोष काळबांडे, शिवणी खुर्द. ता.भातकुली