लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. मात्र, शासनाने शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक केले आहे. असे असले तरी काही शाळांमध्ये शिक्षकांची हजेरी कागदोपत्रीच होती. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने गुरुजींचे चांगभलं असे चित्र आहे.कोरोनाकाळात शिक्षण ‘लॉक’ आहे. आता तरी शाळा सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, मध्यंतरी महसूल खात्याने शिक्षकांची वेगवेगळ्या जबाबदारी हाताळण्यासाठी कर्तव्यावर नेमणूक केली होती. दरम्यान, वाईन शॉपीवरही गुरुजींची नोंदणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर उमटला होता. महसूल, पोलिसांच्या मदतीसाठी शिक्षकांची नियुक्ती झाली होती. मात्र, असे असले तरी ७० टक्के गुरुजींनी कोरोना काळात बसूनच वेतन घेतले, असे वास्तव आहे. ना ऑनलाईन शिकवणी, ना ऑनलाईन अभ्यासक्रम असा सुखद काळ काही शिक्षकांचा गेला, यात दुमत नाही. आता संचारबंदीत शिथिलता आली असून, शाळासुरू करण्यासंदर्भात नियोजन आखले जात आहे. १५ जूनपासून मराठवाड्यातील शाळा ऑनलाईन सुरू झाल्या आहेत. या भागात गुरुजींना ऑनलाईन शिक्षणाची कामे करावी लागत आहे. २६ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू होण्याचे संकेत असून, ऑनलाईन शिक्षणाला प्रारंभ होईल.
शिक्षक काय म्हणतात?
कोरोनाकाळातही शाळा सुरूच होती. ऑनलाईन शिक्षक अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांचे अध्यापन करावे लागले. केवळ कठोर संचारबंदीच्या काळातच शाळेत जाता आले नाही. एरव्ही शाळेचे कामकाज निरंतर होते.- सुरेश माेलके, शिक्षक
ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणे, अभ्यासातील अडचणी सोडविणे ही कामे करावीच लागली. विद्यार्थ्यांविना शाळा असल्या तरी अन्य कामांपासून शिक्षकांची सुटका नाही.- वैशाली परतेकी, शिक्षिका