लोकमत न्यूज नेटवर्कनरेंद्र जावरे अमरावती : ४ मार्चपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. यंदा शाळा तेथे परीक्षा केंद्र दिल्यामुळे विद्यार्थी बिनधास्त झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी असल्याने कुठेच अडचण नसल्याचे केंद्रांवर दिसून येत आहे.पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहेत.मेळघाटातील विद्यार्थी पूर्णत: ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे ना ऑफलाईन ना ऑनलाईन असलेल्या या विद्यार्थ्यांची ढकलगाडीसारखी अवस्था झाली आहे.
‘लोकमत’ने काय पाहिले?
आमचेच विद्यार्थी असल्याने मदत : यंदा शाळेत परीक्षा होत आहेत. विद्यार्थी व शिक्षक एकमेकांना चांगले ओळखत असल्यामुळे त्यांना थोडीफार मदत करावी लागते; मुख्याध्यापकांकडून प्रत्यक्ष मदतीसाठी मनाई केलेली आहे, असे सांगितले.
काय करावे? उत्तर सांगावे लागते : यंदा प्रथमच शाळेतील विद्यार्थी शाळेतच परीक्षा देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारले, तर त्याला मार्गदर्शन करण्यात गैर काय? विद्यार्थ्यांना उत्तर सांगावेच लागते, असे प्रत्युत्तर मिळाले.
अडचण आल्यास विद्यार्थीच विचारतात! : शाळेतच परीक्षा केंद्र. विद्यार्थीही आमचेच असल्यामुळे आमच्याकडून मदतीची अपेक्षा आहेच. परीक्षेत अडचण आल्यास, विद्यार्थ्याने उत्तर विचारल्यास, त्याला सांगावेच लागते. विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल व निकालाची टक्केवारी वाढत असेल, तर कोण मदत करणार नाही.
आतापर्यंत २६ विद्यार्थ्यांवर कारवाई- ४ मार्चपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजीचा पहिला पेपर शांततेत पार पडला. विभागात बारावीचे एकूण ३९७ केंद्र आहेत. त्यापैकी ग्रामीण व शहरी भागातील भरारी पथकांनी कारवाई करीत पहिल्याच दिवशी २६ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे.
बारावीच्या परीक्षेला ४ मार्चपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. भरारी पथक, रनर यांच्या माध्यमातूनही गैरप्रकार रोखण्यासाठी ‘वाॅच’ ठेवला जात आहे.- प्रफुल्ल कचवे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)