अमित कांडलकर
फोटो यायचा आहे.
गुरुकुंज मोझरी : ‘गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावचि भंगता अवदशा, येईल देशा’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत गाव हा किती महत्त्वपूर्ण घटक आहे, हे आवर्जून वर्णन केले आहे. आज तालुक्याच्या राजकीय सारीपाटावर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील शाब्दिक जुगलबंदीमुळे चर्चेत राहणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या गुरुकुंजाला यंदाही पावसाळा तोंडावर येऊन स्मशानवाट लाभलेली नाही.
२८.३९ लाखांचा अमर्याद खर्च फक्त भिंती उभारण्यापुरता मर्यादित होता का? की त्या वास्तूला रस्ता, विकास पण पाहिजे होता, असा सवाल आता जनता उपस्थित करीत आहे. गुरुकुंजात स्मशानवाट नसल्यामुळे भर पावसाळ्यात अंत्ययात्रा जाताना अनेक अडथळे येतात. परिणामी ३ मे २०१८ रोजी चक्क बसस्थानकाच्या समोरासमोर असलेल्या जुन्या जागेवर अंत्यविधी करण्यात आला होता. त्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटले होते. त्याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली. मात्र, तीन वर्षांनंतरही मोक्षधाम स्थळावर जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. याची चर्चा नागरिकांच्या तोंडून प्रत्येक अंत्ययात्रेत होते.
नेत्यांसाठी अर्ध्या रात्री रस्ता!
गुरुकुंजातून काही वर्षांपूर्वी राजकीय सत्ताधाऱ्यांनी धो-धो पावसात एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाकरिता केंद्रीय मंत्री व महाराष्ट्रातील दिग्गज मंत्र्यांना कार्यक्रम स्थळावर पोहचण्यासाठी रात्रीतून काळ्या कसदार शेतातील ओल्या मातीतून रस्ता उभा केला गेला. येथील जनतेने ते जवळून पाहिले आहे.
बॉक्स
स्वर्गरथाची चाक थांबतात महामार्गलगत
गुरुदेवनगर येथील युवा कार्यकर्त्यांनी लोकवर्गणी उभी करून गावकऱ्यांच्या सहकार्यासाठी स्वर्गरथाची नव्याने निर्मिती केली. त्यामुळे अंतिमयात्रा सुनियोजित स्थळावर पोहचणे सुकर झाले. मात्र, स्वर्गरथाची चाके त्या भूमीत पोहचण्यायोग्य रस्ताच नसल्याने महामार्गलगत वर्दळीच्या ठिकाणी ते थांबतात. त्या ठिकाणाहून मृतदेह खांद्यावर नेण्याची वेळ कुटुंबीयांवर येते.
- तर गावकरी निर्माण करतील ‘स्मशानवाट’
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत असताना गावातील उमद्या शिक्षित तरुणाईने संकल्प केला असून, ज्या जागेतून स्मशानवाटेसाठी रस्ता निर्माण होऊ शकतो, त्या शेत मालकासोबत माणुसकीचा संवाद साधून पुढील सोपस्कार लोकवर्गणीतून उभारणार आहे. त्याकरिता सहकार्य व दाते शोधण्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रारंभ झाल्याची माहिती आहे.