लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मध्यप्रदेशातून महाराष्ट्र राज्यात चारचाकी वाहनातून येणारा सुगंधी गुटखा पोलिसांना शुक्रवारी पहाटे सहा वाजता पकडला. चारचाकी वाहन, प्रतिबंधित गुटखा असा एकुण १० लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शेख इरफान शेख बुरहान (३४, रा. मोमीनपुरा अचलपूर) याला अटक करण्यात आली. चारचाकी वाहनात अचलपूरकडे गुटखा जाण्याची माहिती चिखलदरा पोलिसांना मिळाली. त्या आधारे शुक्रवारी पहाटे ६ वाजता घटांग येथून जाणाऱ्या मध्यप्रदेश मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. एमएच ३७ जे ०५९१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात ६ लाख २७ हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. सदर कारवाई ठाणेदार राहुल वाढवे, जमादार गजानन भारती, ईश्वर जांभेकर, सुरेश राठोड, संदीप देवकते, पवन सातपुते, सय्यद इम्तियाज, मनोज खडके, गोपाल शनवारे यांनी केली. कोरोना काळात गुटखाजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. या मागणीची पूर्तता करून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झालीआहे.
अचलपूरमार्गे इतर ठिकाणी तस्करीचा मार्ग परतवाडा ते धारणी मार्गावर घटांग फाट्यापासून कुकरू खामलामार्गे भैसदेही मध्यप्रदेशात जाणारा मार्ग आहे. मेळघाटातून हा रस्ता असल्याने सहसा यावर कुणाची नजर जात नाही. याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत वाहनात भरून गुटखा तस्करी होत असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.