अमरावती: राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना शहरात खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. याकडे अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक पानटपरीवर खुलेआम गुटख्याची विक्री होत असताना अन्न व प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी करतात तरी काय? असा सवाल केला जात आहे.
शहरात मध्यप्रदेशातून सुगंधी तंबाखू, पानमसाला व गुटखा येत असल्याची माहिती आहे.बडनेरा येथील बेलोरा विमानतळ मार्गावर एका गोदामात हा गुटखा उतरतो. तेथून हा गुटखा नागपुरीगेट, इतवारा बाजार परिसरातील गुटखा तस्करांकडे येतो. येथूनच लहान-मोठ्या शहरातील व्यावसायिकांना हा गुटखा पुरविला जातो; मात्र एफडीएकडे असलेल्या दोन ते तीन अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या खांद्यावर संपूर्ण जिल्ह्याचा कारभार असल्याने व त्यांना कारवाईसाठी पोलिसांची मदत मिळत नसल्याची ओरड करुन कारवाई करायला कुणीही धजावत नाही. त्यामुळे गुटखा माफियांची हिंमत वाढली आहे. महिन्याकाठी कोट्यवधींचा हा व्यवसाय शहरात फोफावला आहे. अन्न व प्रशासन विभाग टार्गेट पूर्ण करण्यासाठी थातूर -मातूर कारवाई केली जाते; मात्र कायमस्वरूपी गुटखा शहरातून हद्दपार झाला पाहिजे असे कुणालाही वाटत नाही. पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या सोयीने कारवाई करते मात्र गुटखा माफियांविरुद्ध ठोस अशी भूमिका कोण घेत नाही. एफडीएचे अधिकारीही ठोस भूमिका घेत नाहीत त्यामुळे शहरातील कुठल्याही पानपटरीवर जा सहजच आपल्याला विविध प्रकारच्या गुटख्याच्या पुड्या मिळतात.
बॉक्स:
तरुणाई व्यसनाधीन
गुटख्याच्या पुड्या, सुगंधी तंबाखू, तसेच तंबाखूमिश्रित खर्रा खाऊन तरुणाई व्यसनाधीन होत आहे. २० ते ३० वर्षांच्या तरुणांना मुखाचा, जिभेचा कर्करोग होत असल्याचे कर्करोग तज्ज्ञांचे मत आहे. त्यांना सहज गुटखा उपलब्ध होत असल्याने तरुणाई गुटख्याच्या आहारी गेली आहे..
बॉक्स:
बनावट गुटखा मार्केटमध्ये
राज्यात जरी गुटखाबंदी असली तरी नजीकच्या मध्यप्रदेश राज्यात गुटखा उत्पादित होऊन तो राज्याच्या सीमारेषांवरून राज्यात शिरतो; मात्र हा गुटखा खाण्यायोग्य आहे किंवा नाही? याची तपासणी कुणीही करत नाही. तसेच शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात बनावट गुटखा उत्पादित होऊन तो शहरात विक्री होत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी व एफडीएने याचा शोध घ्यावा. बनावट गुटख्याची विक्री केली जात असेल तर गुटखा खाणाऱ्या शौकिनांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोट
आमच्याकडे अन्न सुरक्षा अधिकारी दोनच आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य नाही. मात्र शहरात गुटखा विक्रेत्यांवर धाडी टाकण्यात येतील. बनावट गुटखा उत्पादित होत असेल तर त्याचा शोध आम्ही घेऊ,वेळप्रसंगी पोलिसांची सुद्धा मदत घेऊ.
शरद कोलते, प्रभारी सह. आयुक्त अन्न अमरावती