दोघांना अटक: मेळघाटात मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची विक्री
चिखलदरा : शनिवारी रात्री चिखलदरा पोलिसांनी एका घरावर टाकलेल्या धाडीत ७० हजार रुपयांचा सुगंधी तंबाखू व गुटखा पकडला. रामकिशोर रामू बेलसरे (४३) व साहेबराव मंगल बेलसरे (४७, रा. दोघेही मांजर कापडी, ता. चिखलदरा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिखलदराचे ठाणेदार राहुल वाढवे यांना मांजर कापडी येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून सहकारी पोलीस उपनिरीक्षक शहाजी रुपनर, जमादार ईश्वर जांबेकर, विनोद अमर, अर्जुन श्रीराम मनोज, गोपाल आदी कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह घरावर धाड टाकली असता घरामागील टिनाच्या छपरीत सहा पोत्यांमध्ये अवैध गुटखा व सुगंधीत तंबाखू आढळून आला. तो गुटखा जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम १८८, २७२, २७३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
बॉक्स
मेळघाटात महिलांमध्येही गुटखा खाण्याचे प्रमाण
गुटखा बंदी असताना मेळघाटात साठवणूक करून विक्री केला जात असल्याचा प्रकार या घटनेने पुढे आला आहे, तर दुसरीकडे मेळघाटातील काही आदिवासी महिलांमध्येही गुटखा पुडी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आदिवासी पाड्यांमध्येही गुटख्याचा साठा मोठ्या प्रमाणात मिळू लागला असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.