गळत्या झोपडीत जीवनाचा प्रवास : शासकीय मदतीपासून वंचितमनीष कहाते वाढोणा रामनाथनांदगाव तालुक्यातील कोव्हळा जटेश्वर येथील शालीकराम आत्माराम साखरकर (६५) हे जन्मत: अपंग आहेत. त्यामुळे गळत्या झोपडीत अपंगत्वावर मात करून एकाकी जीवनाचा प्रवास त्यांचा १२ वर्षांपासून सुरू आहे. त्यांना आजपर्यंतही कोणीही मदतीचा हात दिला नाही. शालीकरामची ७० फुटाची झोपडी अतिक्रमित जागेत आहे. अपंग असल्याने त्यांना चालता-फिरता येत नाही. एकाच जागेवर बसून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून ते जीवन जगत आहे. झोपडीत एक भरणं, एक बकेट आणि एक टोपलं असा संसार. वडील नाही, आई नाही आणि बहीण-भाऊही नाही असे एकाकी जीवन जगणाऱ्या शालीकरामला शासनाकडून निराधार योजनेचे जेमतेम ४०० रूपये प्रतिमाह पगार मिळतो. वेतन मिळविण्याकरिता जवळच्या पापळ येथील बँकेत जायला १०० रूपयाचा आॅटो भाड्याने करावा लागतो. दोनशे रूपयांचा खर्च प्रतिमाह दवाखान्याला लागतो. आईचे छत्र लहानपणीच हरवले. शौचासाठी जात येत नाही. वडील १०० वर्षांपूर्वी वारले. त्यामुळे आकाश हेच वस्त्र आणि जमिनच राहण्याचे ठिकाण अशा बिकट परिस्थितीत सध्या ते जीवन जगत आहे. वडिलोपार्जित कोणतीही संपत्ती नाही. गावातील कोणी काही अन्न आणून दिले तरच पोट भरते. अशातच झोपडीला दार नाही खिडकीही नाही. त्यामुळे जंगलातील साप, विंचूसारखे प्राणी थेट झोपडीत प्रवेश करतात. जमिनीवर गुडघे घासत झोपडीच्या बाहेर येता येते. परंतु कुठेही जात येत नाही. एखादा जनावर अंगावर आला तर हाकलता येत नाही. अनेक वेळा साप अंगावरुन गेला. परंतु दैवशक्तीने आजपर्यंत काही झालं नाही. देव बरोबर करते यावर शालीकरामचा विश्वास आहे. आजारी पडल्यास डॉक्टर घरी येत नाही, झोपायला गादी नाही, पावसाळ्यात झोपडी गळत असल्याने रात्रभर पावसाचे पाणी अंगावर पडते. शासनाने एखादे घरकूल तरी बांधून द्यावे, अशी आशा शालीकरामने व्यक्त केली आहे.
अपंग वृद्धाच्या नशिबी १२ वर्षांपासून वनवास
By admin | Published: September 02, 2015 12:07 AM