अरुण पटोकार - पथ्रोट : कृषीव्यवस्थेचा कणा असलेला कृषक अस्मानी, सुल्तानी संकटासह वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पुरता वैतागल्याचे दिसून येत आहे. मेळघाटच्या वन्यविभागात वावरणाऱ्या वन्यप्राण्यांचा संचार सखल भागात वाढला असून रोही, हरणांचे कळप शेतात हौदोस घालत आहे. शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसत आहे.
नानाविध समस्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या पाचविला पुजला आहे, यात तीळमात्रही शंका नाही. गतवर्षी पेरणीच्या हंगामात नामांकित बियाणे उत्पादित कंपन्यांनी बोगस सोयाबीन बियाणे देऊन केलेली फसवणूक केली. उगवलेल्या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, पीक काढणीला आल्यावर पावसाचे आगमन, उत्पादित मालाची प्रतवारी घसरल्याने कवडीमोल भावाने विक्री करावी लागली. हेही थोडे थोडके नसताना कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे थैमानसह तूर पिकावर मर रोग आल्यानंतरही पीक विमा कंपनीने ठेंगा दाखविला.
या सर्व संकटांना तोंड देत रोहिणी व मृग नक्षत्र बऱ्यापैकी बरसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आशेची नवी स्वप्नं पाहत चेहऱ्यावर उसणे अवसान व हात उसणवार घेत पेरणी केली. मात्र, आर्द्रा नक्षत्रात पाऊस विलगीकरणात गेल्याने पेरलेले बियाणे माकड, हरिण, रोही, रानडुक्करांनी वेतून फस्त केले. यांच्या तावडीतून सुटलेले उगवले असता पिकाचे कोंब नागवाणी (खुरपडीने) फस्त केले. काही तणनाशकाने व तळपत्या सूर्याच्या उष्णतामानाने जळाली. चिखलदरा तालुक्यात सोयाबीन पीक केसाळ अळीने खाल्ले. सध्या शिल्लक पीक रोही व हरिण स्वाहः करीत आहे. जवळपास ही परिस्थिती अचलपूर, अंजनगाव, चिखलदरा तालुक्यात दिसून येत आहे. वनविभागासह शेतकरी हिताच्या सरकारने वन्यप्राण्यांच्या हैदोसाला प्रतिबंध घालावा, असा आर्त टाहो बळीराजा फोडत आहे.