अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपिटीने रब्बी पिकांसह संत्राचे मोठे नुकसान होत आहे. पीक विमा योजनेत सहभागी बाधित शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचे ७२ तासांच्या आत कंपनीकडे पूर्वसूचना करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर कंपनीद्वारा वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्यात येणार आहेत.
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी पीक विमा योजना आहे. या योजनेत रब्बी पिकांसाठी जिल्ह्यातील ८,०३४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. याद्वारे ९,३७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. पीक विमा योजनेच्या निकषानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदलाने पिकांचे नुकसान, गारपीट, पूर, आदी संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास किंवा पीक काढणीपश्चातही पिकांचे नुकसान झाल्यास पीक नुकसानीचे ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना करणे आवश्यक आहे. त्यानंतर कंपनीद्वारा वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाई निश्चित करते. त्यामुळे मुदतीत कंपनीकडे माहिती देणे, रब्बीची ई पीक पाहणी करणे महत्त्वाचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले.