चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर गुरुवारी दुपारी ४.३० वाजता अचानक अवकाळी पावसासह १० मिनिटांपर्यंत बोराच्या आकाराची गारपीट झाली. तालुक्यात काटकुंभ परिसरात तुरळक गारपीटसह पावसाने दमदार हजेरी लावली.
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी चार वाजतापासून तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. काटकुंभ, कनेरी कोयलारी, गांगरखेडा, डोमा, बगदरी आदी परिसरातील गावांमध्ये तुरळक प्रमाणात गारपीट व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील गहू व इतर पालेभाज्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बॉक्स
पंचबोल पॉईंट व जंगलात गारपीट
चिखलदरा : पर्यटनस्थळावरील पंचबोल पॉईंटवर दहा मिनिटापर्यंत चांगलीच गारपीट झाली. त्यामुळे येथील परी परिसरातील नाल्यांमध्ये गारांचा खत जमला होता. यात पर्यटकांनी गारपिटीचा आनंद लुटला. काही नववधुसुद्धा या गार वेचताना दिसून आल्या. सायंकाळी वृत्त लिहिस्तोवर सेमाडोह परिसरात पावसाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.