आर्वी तालुक्यातील घटना : आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प
फोटो : ०९डब्ल्यूएचपीएच०१, ०२, ०३, ०४
वर्धा : सततच्या पावसामुळे झोपेत असलेल्या पती-पत्नीच्या अंगाव घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आर्वी तालुक्यातील दहेगाव (गोंडी) येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने गावात स्मशानशांतता पसरली होती. भिंतीच्या मातीत दबलेले दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. त्यांच्या परिवारातील काही सदस्य जखमी झाले आहेत.
रामकृष्ण महादेव चौधरी (४५) व ज्योती रामकृष्ण चौधरी (४०, रा. दहेगाव (गोंडी) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा आदित्य रामकृष्ण चौधरी (१५) हा जखमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाने घटनेची नोंद घेतली असून, कार्यवाही सुरू आहे. तीन ते चार दिवसांपासून सुुरू असलेल्या पावसामुळे वर्धा-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील उर्ध्व वर्धा (सिंभोरा) प्रकल्पात ९८.३६ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या १३ गेटपैकी १२ गेट ४५ से.मी.ने उघडण्यात आले असून, ५६३ घ.मी.प्र.से. पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले. या नदीवरील आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने या प्रकल्पाचेही सर्व ३१ गेट उघडण्यात आल्याने ३०३५.२४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले तर घरांचीही पडझड झाली आहे. वर्धा नदी ओसंडून वाहत असल्याने आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे.