लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात शनिवारी दुपारी अवकाळी पावसासह मोर्शी व भातकुली तालुक्यात गारपीट झाल्याने रबीचा हरभरा व गहू, तसेच संत्रा व इतर फळपिकांचे नुकसान झाले. याशिवाय वेचणी बाकी असलेला कापूसही भिजला आहे. अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीमधील धान्याचे पोते भिजल्यानेही शेतकरी व व्यापाऱ्यांंचे नुकसान झाले आहे.मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीटमुळे नुकसान झाले होते. आता पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार १० जानेवारीपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती शहरातही दुपारी ४ च्या सुमारास अचानक पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सुरुवातीला कोसळणारे थेंब जोरदार सरींमध्ये रूपांतरित झाले. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून आ़डोशाला यावे लागले. पावसामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.
साऊर, कळमगव्हाण, लसणापूर, रामा, पुसदा, शिराळ्यात गारपीट
टाकरखेडा संभू : परिसरातील साऊर, रामा, पुसदा, कळमगव्हाण, लसनापूर, कृष्णापूर, शिराळा आदी परिसरात शनिवारी दुपारी वादळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे परिसरातील तूर, हरभऱ्याला याचा फटका बसला. पावसाची शक्यता वर्तविली जात असताना साऊर परिसरात दीड वाजताच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोपडले. अर्धा ते पाऊण तास झालेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तूर आणि हरभऱ्याला याचा चांगलाच फटका बसला. ख़रिपात आधीच हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकरी गारद झाला असताना रबीवर शेतकऱ्यांच्या सर्व आशा आहेत. परंतु, अवकाळी पावसामुळे या हंगामातील पिकेदेखील शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे या नुकसानाची पाहणी करून प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
चांदूरबाजारात पाऊस; दिवसभर ढगचांदूरबाजार/नेरपिंगळाई : चांदूरबाजार शहरात दुपारी ३ च्या सुमारास जोरदार पाऊस झाला. याशिवाय मोर्शी येथेही पावसाने हजेरी लावली. शेंदोळा खुर्द येथे हलका ते मध्यम पाऊस कोसळला. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण दिवसभर कायम होते. दरम्यान, नेरपिंगळाई परिसरात तिवसा, चांदूर बाजार रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे झाडे जमीनदोस्त झाली. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे सूरज अवचार यांच्या घरावरील टीन उडाले. जिल्हा परिषद मुलांच्या शाळेचे छत उडाले. शाळा सुरू नसल्यामुळे जीवितहानी टळली. अनेकांच्या शेतात तूर पिकाची कापणी झाली असून गंजी लागलेली आहे. तलाठी पाटील, राठोड, सरपंच सविता खोडस्कर, राजेश मोहकर, राजेश राऊत, पोलीस पाटील यांनी पाहणी केली.