अमरावती : रविवारी दुपारी ४ च्या सुमारास विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या वादळी पावसाने पिकांची धूळधाण केली. वरूड तालुक्यात गारपिटीसह पाऊस कोसळला. यात संत्राबागांचे मोठे नुकसान झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यात सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, चना, भाजीपाला व संत्र्याचेही मोठे नुकसान झाले. वरूड तालुक्यात दुपारी ४.३० च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण होऊन विजेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. टेंभुरखेडा, भेमडी, तिवसा घाट, पुसला, महेंद्री, पंढरी सह आदी भागात गारपीट झाली. यामधे संत्रा, गहू, चनाचे नुकसान झाले. गहू झोपला, तर संत्रा झाडे वादळाने आडवी झाली. शेंदुरजनाघाट, सातनूर, रवाळा, झटामजिरी, वाई, पुसली, मालखेड येथील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील अनेक गावांत सायंकाळी ६.३० च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतातील सवंगणीला आलेला गहू व हरभराचे नुकसान झाले. कोरोनाच्या भीतीमुळे ग्रामीण भागातील शेतमजूर शेतात जात नाही. दुसरीकडे काढण्यासाठी हार्वेस्टर मिळत नाही. त्यामुळे शेतातील गहू व चना तसाच उभा आहे . या वादळी पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसाने वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जोरात वारे वाहले. ग्रामीण भागात सडा टाकल्यागत रिमझिम पाऊस पडला. चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाºयासह सरी बरसल्या. भाजी पाला व फळपिकाला जबर फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. धारणी व चिखलदरा वगळता अन्य १२ तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. मोर्शी व अचलपूर तालुक्यात रात्री ७.४५ च्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. वरू ड तालुक्यातील पुसला, जामठी, उराड, जामगाव, गणेशपूर, पंढरी, सावंगी परिसरात वादळी पाऊस झाल्याने गहू, हरभरा, संत्रा व मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले.
वरुडमध्ये गारपीट, धामणगावात वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 9:26 PM