इंदल चव्हाण -अमरावती : केसांमुळे मानवी शरीराचे सौंदर्य खुलून दिसते. केस गळण्यास सुरुवात झाले की, व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम होतो. गत काही वर्षात बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांनादेखील टक्कल पडत आहे. वाढते ताण-तणाव आणि वेगवेगळ्या औषधांचा वाढता वापर यामुळेही केस गळण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. कोरोना काळात हायडोस औषधींमुळे अनेकांना याचा अनुभव आल्याचे चित्र आहे.
केसांचे गळणे आनुवंशिकतेमुळेही असू शकते. यावर वैद्यकीय सल्ला घेणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केसांचे आरोग्य हे आपल्या दैनंदिन सवयींशी निगडित आहे. केसांच्या समस्येने जेवढा मानसिक ताण स्त्रियांना होतो, तेवढाच पुरुषांनाही असतो. केस पांढरे होऊ नयेत, गळती थांबावी यासाठी अनेक घरगुती उपाय मनुष्य करीत असतो. मात्र, हे उपाय करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. जेणेकरून त्या उपाययोजनांचा विपरीत परिणाम थांबेल.
बॉक्स
कोविडनंतर तीन महिन्यांनी केस गेले
कोरोनाबाधित काही रुग्णांना उपचारादरम्यान हायडोस औषधी घ्यावी लागली. त्याचा परिणाम केस गळतीत झाले. कोरोनातून बरे झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात डोक्यावरील केस विरळ झाले. काहींचे तर टक्कलच झाल्याचे वास्तव हळूहळू समोर येत आहे.
--
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच करा घरगुती उपाय
आयुर्वेदात केसांसाठी अनेक उपाय आहेत. नारळ तेलात लसणाच्या कळ्यांचे मिश्रण करून लावणे, जासवंदाच्या फुलाचा वापर, नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावणे, कांद्याचा रस असे कितीतरी प्रकार आहेत. हे सर्व उपाय करण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल. अन्यथा विपरीत परिणामाला सामोरे जावे लागेल.
--
हे करा
कांद्याचा रस डोक्याला लावा. अर्ध्या तासांनी शाम्पूने डोके धुऊन घ्या
आठवड्यातून किमान एकदा कोरफडाने डोक्याची मालीश करून घ्या
कमकुवत केसांसाठी मेथी दाणे फायदेशीर ठरू शकतात. रात्री दोन चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घाला. त्यानंतर सकाळी त्याचा लेप करून डोक्याला लावा. ऑलिव्ह तेलाने डोक्याची मालीश करा. या तेलामुळे मुळातील कोरडेपणा नष्ट होऊन केस मजबूत होतात.
--
प्रोटीनयुक्त आहार घ्या
कोट
प्रोटीनयुक्त आहार दररोज घेतल्यास केसांना प्रोटीनचा पुरवठा होऊन केस मजबूत होतात. झोप महत्त्वाची आहे. कुठलेही काम तणावत करू नये. आनुवंशिकतेने केस गळतात. मात्र, या उपाययोजनांनी थोडे समाधान मिळते.
- डॉ. अविनाश सावजी, त्वचारोगतज्ज्ञ