जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या तीन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. जिल्ह्यातील १,४४४ फेऱ्यांपैकी १४६ फेऱ्या सुरू असून बसेस निम्म्याहून अधिक रिकाम्याच धावत आहेत. त्यामुळे एसटीचे प्रवासी गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आठ आगारांतील कर्मचारी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, याकरिता संपावर आहेत. त्यानंतर एसटी बस रस्त्यावर दिसली नाही. आता काही कर्मचारी कामावर परत आले असल्याने एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढत असून, आज ५२ बसेसव्दारे १४६ फेऱ्या सुरू आहेत. मात्र, एसटीला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दिसून येत आहे.
४,००,००,००० रुपयांचा फटका बसला चार महिन्यात राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाला आतापर्यंत जवळपास चार कोटींचा फटका बसला आहे. तर गेल्या चार महिन्यांत ५३ बसव्दारे १५३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ कोटी ८० लाख रूपयांचे उत्पन्न अमरावती विभागाला मिळाले आहे.
आगारप्रमुख काय म्हणतात?एसटीचा संप सुरू झाल्यानंतर काही दिवस बसेस बंद होत्या. अशातच आता बसेस सुरू झाल्या आहेत. अनेक मार्गांवर बसेस धावू लागल्या आहेत. त्यांना प्रवाशांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे.- संदीप खवले, आगारप्रमुख, अमरावती
आठही आगारांत ५० पेक्षा जास्त बसेस धावतात. एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी ५० खासगी चालक करारावर घेतले आहेत,वाहकांची जबाबदारी ही एका खासगी कंपनीला दिली. त्यामुळे बसेस पूर्ण सुरू होतील.- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक
ग्रामीण भागात बसेस कधी जाणार?जिल्ह्यात एसटीला ग्रामीण प्रवाशांचा मोठा आधार असतो. परंतु, एसटीचा संप सुरू झाल्यापासून गत तीन महिन्यांत ग्रामीण भागात एकही बस गेलेली नाही. ग्रामीण भागातील प्रवासी शहरात खासगी वाहनांनी येतात. त्याचाही एसटीवर परिणाम झाला आहे.