जेवड बिटच्या परिसरातील घटना : वनविभाग पोहोचले तीन तास उशिराअमरावती : छत्री तलावापासून भानखेडाकडे जाणाऱ्या मार्गावरील जेवड बिटच्या जंगलात गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतरही वनकर्मचारी तीन तास उशिरा पोहोचल्यामुळे आगीमुळे अर्धा किलोमीटरपर्यंत जंगल जळून खाक झाले होते. शहरालगतच असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणाला गालबोट लावणारी ही घटना वर्षाच्या शेवटच्या दिवशी व वर्षांच्या शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचली होती. छत्री तलावापासून भानखेडाकडे जाणाऱ्या मार्गावर एक ते दीड किलोमीटर अंतरावर उंच टेकडीचा भाग आहे. टेकडीखालील दरीमध्ये सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास जंगलात आग लागल्याचे मधुबन वन्यजीव संरक्षण संस्थेचे नीलेश कंचनपुरे व त्यांचे सहकारी निसर्गप्रेमींना दिसले. त्यांनी तत्काळ याआगीबाबत माहिती वनविभागाला कळविली. त्यानंतर त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा सुरू केली. आग हळूहळू जंगलात पसरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी वारंवार वनविभागाशी संपर्क साधला. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा रात्रीचे १० वाजले होते. आगीच्या माहितीवरून राजापेठ पोलीस व अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेला नव्हता. मात्र, आग दरीमधील जंगलात असल्यामुळे तेथे अग्निशमन वाहन पोहोचू शकले नाही. त्यानंतर काही वेळात वनविभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आग जंगलात पसरत असताना वनविभागाही हतबल झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापर्यंत निसर्गप्रेमी व काही पत्रकारही घटनास्थळी उपस्थित होते. याबाबत उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी) ५ वाजताच्या सुमारास जंगलाला आग लागल्याची माहिती मिळाली होती. ती आग वनकर्मचाऱ्यांनी विझविली होती. मात्र, पुन्हा रात्रीच्या सुमारास आग लागल्यावर ती मध्यरात्रीदरम्यान विझविण्यात आली आहे. - निनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.
अर्धा किलोमीटरचे जंगल जळून खाक
By admin | Published: January 02, 2016 8:29 AM