लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीओ मार्गावरील बारसमोर एका युवकाच्या डोक्यावर काचेची बाटली मारल्यानंतर त्याच आरोपींनी अन्य एकावर शेगाव नाका येथील एका हॉस्पिटलसमोर चाकूने प्राणघातक हल्ला केला. १ एप्रिल रोजी रात्री ९.३० ते १०.४५ च्या दरम्यान हा थरार घडला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी सागर खिराडे, सिद्धार्थ वानखडे, सूरज सावते (१९, रा. शेगाव), अभिनव ठाकरे, आयुष ऊर्फ अविश मिश्रा (१९, रा. प्रवीणनगर) या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. अभिनव ठाकरे, आयुष मिश्रा व सुरज सावते यांना पोलिसांनी अटक केली. कार्तिक कांडलकर (रा. यावली शहीद) याला हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री ९.३०च्या सुमारास आरटीओ मार्गावरील बारसमोर मारहाण केली. यावेळी काचेची बाटली त्याच्या डोक्यावर फोडली. मारहाणीची माहिती कार्तिकने भाऊ सुमीतला दिली. त्यामुळे सुमीत, त्याचे मित्र शुभम नागपुरे, प्रणय कांडलकर हे पोहोचले. कार्तिकला दुखापत झाल्यामुळे सुमित व त्याचे मित्र त्याला घेऊन शेगाव नाका परिसरातील खासगी रुग्णालयात पाेहोचले. काही वेळातच पाचही हल्लेखोर त्यांच्यामागे आले. त्यांनी शुभम व प्रणयला मारहाण सुरू केली. सागर खिराडे व सिद्धार्थ वानखडे यांनी शुभम नागपुरे याच्या मानेवर चाकूने सपासप वार केले, तर अन्य तीन आरोपींनी दहशत निर्माण करून त्या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, शुभम नागपुरे याला गंभीर स्थितीत राजापेठ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, तर कार्तिक कांडलकर, प्रणय कांडलकर यांच्या कपाळ व डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी येत तिघांना ताब्यात घेतले. मात्र, दोघे पळून गेले. याप्रकरणी सुमीत कांडलकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी २ एप्रिल रोजी पहाटे पाच जणांविरूद्ध भादंविचे कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९ व आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक खंडारे हे पुढील तपास करत आहेत.