लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : मध्यप्रदेश सीमेहून मोर्शी ते नांदगाव पेठ रस्त्यावर एच.जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सिमेंट रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता तयार करताना त्यावर गोण्या टाकून अत्यल्प पाणी मारले जात आहे. वॉटर क्यूरिंगमध्ये कंत्राटदार हलगर्जी दाखवीत असल्याची चर्चा आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट रस्त्याची निर्मिती केली जात असताना कामात निकृष्टपणा असल्याचे सांगण्यात येते. उन्हाळ्यातही सुताच्या गोण्या वापरून पाणी टाकले. परंतु सतत ओलावा असणे आवश्यक असताना क्युरिंग होत नसल्याने रस्त्याला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मिनीस्ट्री आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेच्या अख्त्यारितील मध्यप्रदेश सीमेपासून करवार ते मोर्शी हे ५२ .३९ किमी अंतर रस्त्यावर २९४.५१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, तर मोर्शी ते नांदगावपेठ या ४३ किमीच्या रस्त्यावर २४३.११ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. रस्ता विस्तारीकरण जोमाने सुरू आहे. परंतु कंत्राटदार कंपनीकडून कामामध्ये हलगर्जीपणाचा कळस गाठल्याने निकृष्ट काम होत असल्याच्या चर्चा आहे. मातीच्या धुरामुळे श्वसनाचे आजार व मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. यावर दिवसभर पाण्याचा ओलावा टिकून राहणे आवश्यक आहे. मात्र, तसे न होता दिवसातून एकदाच गोणीवर पाणी टाकले जाते. यामुळे रस्त्याला तडे जाण्याची शक्यता आहे. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने कंत्राटदाराच्या मनमानीपणा सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे रस्त्याचे आयुष्य वाढण्याऐवजी घटण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.
सिमेंट रस्त्यात क्यूरिंगमध्ये हलगर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:01 PM
मध्यप्रदेश सीमेहून मोर्शी ते नांदगाव पेठ रस्त्यावर एच.जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सिमेंट रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता तयार करताना त्यावर गोण्या टाकून अत्यल्प पाणी मारले जात आहे.
ठळक मुद्देउन्हाळ्यात तडे जाण्याची शक्यता : निकृष्ट कामाचा परिणाम