बडनेरा : विशाखापट्टनम येथून नाशिकसाठी प्राणवायू घेऊन जाणारी ऑक्सिजन एक्सप्रेस शुक्रवारच्या मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचली. येथे नवीन चालक चढल्यानंतर गाडी नाशिककडे रवाना झाली.
महाराष्ट्रात वेगाने पसरत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी विशाखापट्टनम येथून ऑक्सिजनचे टँकर रेल्वेगाडीने नाशिकसाठी जात असताना ही एक्सप्रेस शुक्रवारच्या मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचली. येथे चालकांची अदला बदली झाली. तीन मिनिटे हॉल्ट घेतल्यानंतर ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकसाठी रवाना झाल्याची माहिती प्रभारी स्टेशन मास्तर पुंडलिक कुर्झेकर यांनी दिली. येथून रेल्वे सुरक्षा बलाचे चार कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गाडीसोबत भुसावळपर्यंत गेले. तेथे दुसरा स्टाफ चढणार होता. ज्या वेळेस गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर आली. तेव्हा रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या गाडीवर ऑक्सिजनचे चार टँकर होते. प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या लागून असणाऱ्या रेल्वे रुळावर सदरची ऑक्सिजन एक्सप्रेस थांबली. बडनेरा रेल्वे स्थानकावर हॉल्ट ठेवण्यात आल्याने रेल्वे प्रशासन दिवसभरापासून कामाला लागले होते.