प्रदिप भाकरे,अमरावती : जिल्ह्याच्या सिमेवरील मध्यप्रदेश राज्यातील विविध परिसरात गावठी हातभट्टी दारू काढून ती अमरावती जिल्हयात विकली जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी दुपारी मध्यप्रदेशातील आठनेर पोलिसांच्या सहकार्याने मध्यप्रदेशातील गावठी हातभट्टया उध्वस्त केल्या. त्यापुर्वी मंगळवारीच अन्य एका पोलीस पथकाने मध्यप्रदेशातील भैसदेही पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देखील ४.९५ लाख रुपयांचा हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट केला होता.
आठनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनोरा येथील जंगल परिसरात आठनेर व अमरावती पोलिसांचे संयुक्त पथकाने अवैध गावठी दारू विरूध्द कारवाई केली. त्यात एकूण १६ ड्रम मोहा सडवा व गावठी हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य व मुद्देमाल असा एकुण ५ लाख ४३ हजार रुपयांचा माल नष्ट करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यात हातभट्टीच्या दारूची वाहतुक होत असल्याचे त्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
२० डिसेंबर रोजीपासून बहिरम येथील यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने १९ डिसेंबर रोजी ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा तसेच मध्यप्रदेशातील आठनेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन्ही राज्याचे सिमा परिसरात गावठी दारू विरूध्द विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक विशाल आंनद, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक उल्हास राठोड, आठनेरच्या ठाणेदार राजन उईके यांनी केली.
नांदगांव पोलिसांची हातभट्टी दारूविरूध्द कार्यवाही :
१९ डिसेंबर रोजी नांदगांव खंडेश्वर पोलीस पथकाने शिरपुर परिसरात गावठी दारूविरूध्द विशेष मोहिम राबवुन चार आरोपींकडून११९ लिटर अवैध गावठी दारू व १६ ड्रम मोहा सडवा नष्ट करण्यात आला. उप-विभागीय पोलीस अधिकारी सुर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनात नांदगावचे ठाणेदार विलास पोळकर व पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.