अमरावती : जिल्ह्यातील हातपंप दुरुस्तीच्या कामासाठी चालू आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीकडून १ कोटी ४७ लाख १ हजार रुपयांची वार्षिक वर्गणी वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय १४ पंचायत समित्यांकडे मागील वर्षीही थकबाकी आहे. दोन्ही मिळून २ कोटी ३४ लाख ३५ हजार ५३१ रुपये वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत १ कोटी ३१ लाख ४ हजार ६० रुपये वसूल झाले असले तरी १ कोटी २४ लाख १४ हजार ७१ रुपयांची थकबाकी अद्यापही १४ पंचायत समित्यांकडे बाकी आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम भरण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीतील यांत्रिकी उपविभागाने गटविकास अधिकारी (बीडीओ) १९ डिसेंबर रोजी लेखी पत्राद्वारे दिले आहेत.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत जिल्ह्यात ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्तीची कामे करण्यात येतात. दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी दरवर्षी पंचायत समितीमार्फत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून वार्षिक वर्गणी जमा करण्यात येते. त्यामध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील हातपंपाच्या कामासाठी १ कोटी २४ लाख १४ हजार ७१ रुपये वार्षिक वर्गणी जमा करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेमार्फत ठेवण्यात आले. यांसह गत आर्थिक वर्षातील वसुलीची निम्म्याहून अधिक रक्कम पंचायत समितीकडे थकीत आहेत. या दोन्ही मिळून १४ पंचायत समित्यांकडे थकीत असलेली रक्कम भरण्याबाबत जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाने गटविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन रक्कम भरण्याबाबत निर्देश दिले आहेत.
बॉक्स
तालुकानिहाय हातपंप संख्या
अमरावती ५४१, भातकुली ५४४, अंजनगाव सुर्जी १८१, भातकुली २८२, चांदूर बाजार ३५९, चांदूर रेल्वे ३६५, चिखलदरा ३६५, धारणी ४९४, धामणगाव रेल्वे ४८०, दर्यापूर ५८, मोर्शी २७२, नांदगाव खंडेश्वर ७०९, तिवसा ३७०, वरूड ३४८ अशी एकूण ५ हजार ३६८ हातपंपाची संख्या आहे.
काेट
जिल्ह्यातील हातपंप दुरुस्तीच्या कामासाठी १ कोटी २४ लाख १४ हजार ७१ रुपये वार्षिक वर्गणी वसुली उद्दिष्ट आहे. परंतु, हातपंप दुरुस्तीच्या वर्गणीची रक्कम भरण्याबाबत जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडून लेखी स्वरूपात गटविकास अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले आहे.
- अरुण बोंदरे, उपविभागीय अभियंता, यांत्रिकी विभाग