जबाबदाऱ्यांची जाणीव, ती पूर्ण करण्याची लगबग, त्यासाठी येणारा उत्साह व एकंदर सोहळ्यातील आनंद कोरोने हिरावला आहे. गतवर्षीपासून लग्नाची व्याख्याची बदलून गेली आहे. गावोगावी विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या युवक-युवतींची संख्या मोठी आहे. गतवर्षी आठवा गुरू असल्याने अनेकांचे विवाह होऊ शकले नाहीत, तर काहींच्या घरगुती अडचणीमुळे विवाह जुळविताना अडचणी आल्या. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत आपले लग्न होईल, अशी अपेक्षा लागून राहिलेल्यांना कोरोनारूपी आठवा गुरू कायम राहिला आहे. संसर्गमुक्त होण्यासाठी प्रशासनाकडून त्रिसूत्रीचा अवलंब करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे विवाहाला उपस्थित वऱ्हाडींच्या तोंडाला मास्क आले. मुळातच २५ जणांच्या उपस्थितीत विवाह करण्याच्या आदेशामुळे विवाह सोहळ्यांचा उत्साह मावळला आहे. त्यातच दोन तासांत सोहळा उरकण्याचे प्रशासनाचे आदेश असल्याने कपडे, मेंदी, रूपसज्जा अशा कुठल्याही बाबीवर खर्च होण्याऐवजी नियोजित वर-वधूंना थेट बोहल्यावर आणले जात आहे. आटोपशीर लग्नाचा मंत्रच कोरोनाने दिला आहे.
------------------
मेंदी, कपडे राहिले
ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात ज्यांचे लग्न जुळले, त्यांची या सोहळ्यातील हौसमौज करण्याची इच्छा अधुरी राहिली. वधूच्या हातावर मेंदी रंगविण्यासाठी प्रशासनाने वेळ दिला नाही. त्यात २५ जणांच्या विवाह सोहळ्यात मेंदीचे कौतुक कोणाकडून करून घ्यायचे, हादेखील प्रश्न आहे. वरांची सूट-बुटाची अपेक्षा लॉकडाऊनने संपविली. चोरून-लपून कपडे खरेदी करण्याचे ज्यांनी टाळले, त्यांना नेसत्या वस्त्रानिशी लग्नासाठी अंतरपाटापुढे उभे राहावे लागले.
--------------
यंदा कर्तव्य, पण कसे जमणार?
विवाह सोहळ्यात पाहुणे जमतात ते बहुतांश नातेसंबंधातील विवाह जुळविण्यासाठी. मात्र, २५ जणांच्या उपस्थितीत चर्चा होणार कशी? त्यामुळे विवाहयोग्य मुलामुलींचे विवाह जुळविण्याच्या दृष्टीने पुढील बोलणीला कोरोनाचे लॉकडाऊन अडचण ठरत आहे.