अमरावती : मणिपूर राज्यात आदिवासी महिलांना भररस्त्यात नग्न करुन धिंड काढत सामूहिक बलात्कार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फासावर लटकवा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी ट्रायबल वुमेन्स फोरमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यामार्फत शुक्रवारी निवेदन पाठविण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये जमावाने दोन आदिवासी महिलांची भररस्त्यात नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या संतापजनक घटनेचा ट्रायबल वुमेन्स फोरम, ट्रायबल फोरम, ट्रायबल युथ फोरम या संघटनांनी जाहीर निषेध नोंदविला आहे. मन हेलावून टाकणारी घटना देशात घडली असून सकल जगातील मानवतेला काळीमा फासणारी असल्याचा गंभीर आरोप ट्रायबल वुमेन्स फोरमने केला आहे.
मणिपूर राज्यातील थौबाल जिल्ह्यात दोन आदिवासी महिलांना काही नराधमांनी घेरले. त्यांनी त्या महिलांना विवस्त्र करुन त्यांची भररस्त्यात नग्न धिंड काढली. त्यानंतर त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सदर घटना ही ४ मे २०२३ रोजीची असल्याचा दावा करण्यात आला आहे.
गत मे महिन्यापासून मणिपूर राज्यात सातत्याने आदिवासी समाजावर अनन्वित अन्याय, अत्याचार, जाळपोळ, जातीय हिंसा, सामूहिक बलात्कार होत आहे. तरी सुद्धा केंद्र सरकारने आजपर्यंत याबाबत कोणतीही कठोर भूमिका घेतलेली नाही, असाही आरोप करण्यात आला आहे.
याप्रसंगी ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य संघटक महानंदा टेकाम, शकुंतला मरसकोल्हे, सुरेखा उईके, नलिनी सिडाम,अर्चना धुर्वे, जोत्सना चुंबडे, शीला चांदेकर, जयश्री मरापे, मंगला सयाम, छाया आत्राम, पुष्पा सयाम, ललिता उईके, सुरेखा पेंदाम, माया धुर्वे, सिंधू मरसकोल्हे, नंदा आत्राम, शुभांगी सिडाम, सुकन्या मरसकोल्हे, महानगर अध्यक्ष सुंदरलाल उईके, जिल्हाध्यक्ष दिनेश टेकाम, गंगाराम जांबेकर, राजेश उईके, शशिकांत आत्राम, संतोष किरनाके, हिंमत उईके, श्रीकृष्ण उईके, शत्रुघ्न मडावी, मनोहर कोकाटे, पंकज सलाडे, प्रवीण गंजाम, वैभव लोखंडे आदी उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे होत आहे. तरीही या देशातील विचित्र, विक्षिप्त, विकृत मानसिकता बदलली नाही. आदिवासी महिलांवरील अत्याचार सहन केल्या जाणार नाहीत. मणिपूर राज्यात तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.
- महानंदा टेकाम, राज्यसंघटक, ट्रायबल वुमेन्स फोरम.