हनुमान जयंती : बडनेऱ्यातील ६५ वर्षांपासूनची परंपरा बडनेरा : स्थानिक बारीपुऱ्यातील हनुमान मंदिरातील हनुमान जयंती उत्सवाच्यानिमित्ताने माणसांनी भरलेल्या ११ बैलगाड्या एकट्या हनुमान भक्ताने ओढून उपस्थितांना अवाक केले. दरवर्षीच हनुमान जयंतीला येथे ही आगळीवेगळी परंपरा पार पाडली जाते. मागील ६५ वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. यंदा सागर अंबाडकर नामक हनुमानभक्ताला बैलगाडी ओढण्याचा मान मिळाला. बारीपुऱ्यातील हे हनुमान मंदिर शतकोत्तरी आहे. दरवर्षी या मंदिरात हनुमान जयंती उत्सव थाटात साजरा केला जातो. इतर धार्मिक अनुष्ठानांसह बैलगाडी ओढण्याच्या कार्यक्रमाची भक्तांना प्रतीक्षा असते. तब्बल ६५ वर्षांपूर्वी रूपचंद जाट नामक हनुमानभक्ताने त्याला झालेल्या दृष्टांतावरून बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम सुरू केला.प्रत्येक भक्त सलग पाच वर्षे ओढतो गाडाबडनेरा : हा हनुमानभक्त मारूतीरायाचा मनोभावे सेवा करीत होता. याच मंदिरात तो राहात असे. या भक्ताने सुरू केलेली ही परंपरा मंदिर व्यवस्थापनाने पुढे सुरू ठेवली आहे. येथे प्रत्येक हनुमानभक्त सलग पाच वर्षे बैलगाडी ओढतो. यंदा सागर अंबाडकर नामक हनुमानभक्ताने माणसांनी ठासून भरलेल्या तब्बल ११ बैलगाड्या ओढून उपस्थितांना अवाक् केले. यापूर्वी तुकाराम निचत, राजेंद्र लाड, संजय माहुरे, मंगेश पेटले, शाम दातिर, सुरेश पोकळे, विलास तेटू, रमेश गुजर यांच्यासह अनेक हनुमानभक्तांना बैलगाड्या ओढण्याचा मान मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)अर्धा किलोमीटर ओढल्या बैलगाड्याबैलगाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाने या मंदिरातील हनुमानजयंती उत्सवाचा समारोप केला जातो. स्थानिक रेल्वे फाटक ते हनुमान मंदिरापर्यंतचे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत एकमेकांना बांधलेल्या व माणसांनी ठासून भरलेल्या बैलगाड्या सागर यांनी ओढत नेल्या. यावेळी उसळलेली बघ्यांची गर्दी पाहता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हनुमानभक्ताने ओढल्या ११ बैलगाड्या
By admin | Published: April 12, 2017 12:37 AM