पथ्रोट (अमरावती) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत सरकारने घरोघरी तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमांतर्गत ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान, घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार कापूसतळणी येथील उर्दू शाळेने केंद्र शासनाने नेमलेल्या पुरवठादाराकडून ५०० राष्ट्रीय ध्वज बोलावले. तथापि, सदोष ध्वजांचा पुरवठा झाला आहे. त्यात परत घेण्यास नकार मिळाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
पुरवठादाराने पुरवलेल्या ध्वजाचे कापड ठिकठिकाणी उसवलेले, फाटलेले आहे. आकार आयताकृती नसून अशोकचक्र एकाच बाजूला आहे. केशरी रंगानंतर पुन्हा पांढऱ्या रंगाची पट्टी आहे. कापूसतळणी येथील हैदरिया उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहसीन यांनी संकेतस्थळावरील माहितीवरून नोयडा सेक्टर ५८ येथील एका पुरवठादाराकडून प्रत्येकी ३० रुपयांप्रमाणे ५०० ध्वजांकरिता १५००० रुपये पाठवले होते. त्यानुसार ध्वजाचे पार्सल कुरिअरने सोमवारी मिळाले. त्यामध्ये दोषयुक्त ध्वज आल्याने ते वितरित करायचे की नाही, या संभ्रमात मुख्याध्यापक आहेत. ध्वज फडवल्याने राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होणार नाही काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
मुख्याध्यापकांनी ध्वज परत घेण्याबाबत पुरवठादारास विचारणा केली असता त्यास नकार दिला. या गंभीर प्रकाराबाबत तहसीलदार अभिजित जगताप यांच्याकडे त्यांनी धाव घेतली असता, संबंधित पुरवठादारास कळवा, बीडीओंकडे ती जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
प्रकरण गंभीर आहे. ध्वजसंहितानुसार ध्वज नसेल तर तो फडकवूच नये. संबंधित पुरवठादाराकडून ध्वज बदलून घ्यावे.
- विनोद खेडकर, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी