गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशाला रोजगार हमी योजना देणाऱ्या महाराष्ट्रात 'रोहयो'ची पीछेहाट झालेली आहे. मजुरीच्या दरात हरयाणा इतर राज्यांच्या तुलनेत क्रमांक १ वर आहे. हरयाणात रोहयो मजुरीचा दर ४०० रुपये आहे. तर महाराष्ट्रात हा दर ३१२ रुपये आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या राजपत्रातून 'रोहयो'चे देशभरातील वास्तव पुढे आले आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर रोजगार हमी योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर २००५ मध्ये केंद्र सरकारने या योजनेला देशपातळीवर पोहोचविले. मात्र, 'रोहयो'ची जननी असलेल्या महाराष्ट्रात बिकट अवस्था आहे. दिवसेंदिवस मग्रारोहयोच्या मजुरांची संख्या घटत आहे. सुमारे १ लाख कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मजुरांची संख्या लक्षात घेता मजुरी दर अत्यंत कमी आहे.
राज्यात २६ हजार कामांवर १.७६ लाख मजूर
- 'मनरेगा'अंतर्गत राज्यात सद्यः स्थितीत २५,९९३ कामे सुरू आहेत. यावर १,७६,३०१ मजुरांना रोजगार मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक ३,१८८ कामे अमरावती जिल्ह्यात, तर सर्वांत कमी ९ कामे धाराशिव जिल्ह्यात सुरू आहेत.
- सर्वाधिक २१,७६६ मजूर परभणी जिल्ह्यातील १,८७४ कामांवर आहेत. योजनेंतर्गत पहिले १०० दिवसांचे पेमेंट केंद्र शासनाद्वारा व नंतरच्या दिवसांचे पेमेंट राज्य शासनाद्वारे दिले जाते.
इतर यंत्रणेचे कंट्रोल काढलेपूर्वी रोहयो कामांचे नियोजन, नियंत्रण आणि व्यवस्थापन त्या-त्या शासकीय यंत्रणेकडे असायचे. मात्र, मध्यंतरी रोहयोचे नियंत्रण महसूलने हाती घेतल्यामुळे इतर विभागांनी या कामात रस दाखवणे कमी केले. विशेषतः कुशल कामांसाठी आवश्यक निधी वेळेवर मिळत नसल्याने अनेक योजनांवर परिणाम झाला. महसूल विभाग समोर येत नाही. परिणामी, ग्रामीण भागातील रोजगार संधी घटल्या आहेत.
देशभरातील मजुरीचे दरकेंद्र शासनाच्या राजपत्रामध्ये 'रोहयो'चे राज्यनिहाय दर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार हरयाणा ४०० रुपये, आंध प्रदेश ३०७ रुपये, अरुणाचल प्रदेश २४१ रुपये, आसाम २५६ रुपये, बिहार २५५रुपये, छत्तीसगड २६१रुपये, गोवा ३७८ रुपये, गुजरात २८८ रुपये, हिमाचल प्रदेश ३०९ रुपये, जम्मू-काश्मीर २७२ रुपये, लदाख २७२ रुपये, झारखंड २५५ रुपये, कर्नाटक ३७० रुपये, केरळ ३६९ रुपये, मध्य प्रदेश २६१ रुपये, महाराष्ट्र ३१२ रुपये, मणिपूर २८४ रुपये, मेघालय २७२ रुपये, मिझोराम २८१ रुपये, नागालँड २४१ रुपये, ओडिशा २७३ रुपये, पंजाब ३४६ रुपये, राजस्थान २८१ रुपये, सिक्कीम २५९ रुपये, तामिळनाडू ३३६ रुपये, तेलंगणा ३०७ रुपये, त्रिपुरा २५६ रुपये, उत्तर प्रदेश २५२ रुपये, उत्तराखंड २५२ रुपये, अंदमान ३४२ रुपये, दादरानगर हवेली ३४० रुपये, लक्षद्वीप ३३६ रुपये, पुदुचेरी ३३६ रुपये दर आहे.