- मनीष तसरे
अमरावती : डबेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. डबे पोहोचवण्याचे काम ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ज्या अचूकतेने हे काम केले जाते, त्या कारणाने मुंबईचा डबेवाला संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत आणि तोच पॅटर्न अमरावतीतदेखील राबविण्यात येत आहे. काळानुरूप बदल होऊन अमरावतीतसुद्धा ‘डबेवाला’ ही सेवादेखील पाहायला मिळत आहे.
अमरावती शहर हे देखील आता विस्ताराने अवाढव्य झाले. अनेक उद्योगधंदे हे शहराच्या बाहेर आले. शहराला लागून असलेल्या नांदगाव पेठनजीक होलसेल कपडा व्यवसाय सुरू झाला. दुकानाच्या कामाच्या जागी वेळेवर पोहोचण्यासाठी दुकानदार व नोकरदार मंडळींना घरातून लवकर निघावे लागते. डबेवाल्यांच्या यंत्रणेमुळे बहुसंख्य गृहिणी गरम जेवण भरलेला डबा दुकानात पाठवू शकतात.
शहरातून अनेक कपडा व्यावसायिक नांदगाव पेठनजीक असलेल्या सोटी लँड, बिझी लँड आणि ड्रीम लँड या ठिकाणी असलेल्या होलसेल कपडा मार्केटमध्ये स्थिर झाले. दुकाने उघडण्यासाठी सकाळी घरून लवकर निघावे लागते, त्यामुळे दुपारचा जेवणाचा डबा सोबत घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे जेवणाच्या वेळेपर्यंत डबेवाला घरून डबा दुकानात पोहोचून देतात.