नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आरोग्यासाठी गाय, म्हैस, शेळीचे दूध उत्तमच. मात्र, गाढविणीच्या दुधाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. गाढविणीच्या दुधाला प्रतिलिटर तब्बल दहा हजारांचा दर आहे. हे दूध आता दुर्मीळ आजारांवर रामबाण ठरत आहे. गाढविणीच्या दुधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. परिणामी, या दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
दुधाला सोन्याचा भाव
ग्रामीण भागात आजही गाढवांचा वापर कुंभारकामातील माती, ओझे वाहण्यासाठी, दळणवळणासाठी सर्रास केला जातो. नदीकाठच्या गावात याच गाढवांचा वापर वाळूची वाहतूक करण्यासाठी केला जातो. मात्र, गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव असल्याचे ग्रामीण भागात माहीत आहे, पण मिळत नसल्याचे पशुपालक सांगतात. पूर्वीपेक्षा या पशूचा दळणवळणासाठीचा वापर कमी झाला आहे.
परतवाडा शहरातील दयाल घाट येथे गाढवांचा पोळा भरतो. अचलपूर शहरातील अनेक मोहल्ल्यात गाढव आहेत. गाढविणीच्या दुधाला आता सोन्याचा भाव असला तरी माणुसकी आणि स्नेहसंबंध या बाबींवर ते अल्प किमतीतही दिले जाते.
जिल्ह्यात कोठे मिळते गाढविणीचे दूध ?
अमरावती जिल्ह्यातील १४ पैकी धारणी, चिखलदरा वगळता इतर तालुक्यांमध्येही काही भागात गाढव पाळले जातात. परतवाडा, अचलपूर शहरात थोडी संख्या जास्त आहे. सतत होणारी सर्दी, ताप असे आजार टाळण्यासाठी लहान मुलांना गाढविणेचे दूध पाजण्याचे प्रमाण ग्रामीण भागात आजही पाहायला मिळते.
गाढविणीचे दूध खूप फायद्याचे कारण..
गाढविणीच्या दुधात रोगप्रतिकार शक्ती अधिक असते. अस्थमा, सतत होणारी सर्दी, पचनक्रिया सुधारणे, खोकला, ताप, संसर्गजन्य रोग, पोटाचे विकार, आतड्यांचे विकार, हृदयरोग आदी उपयुक्त गुण आहेत. दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
व्यावसायिक म्हणतात....
गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव असला तरी ग्रामीण भागात शहरी आणि इतर नागरिक लहान मूल जन्मल्यावर दुधाला येतात. लहान दोन चमचे दूध दिल्यावर नारळ, दुपट्टा आणि दक्षिणा देत ओवाळणी घालतात. काही नागरिक गाढविणीच्या प्रसूतीदरम्यान बाहेर पडणारा जारसुद्धा लहान मुलांच्या पाळण्याला बांधण्यासाठी नेतात. त्यामुळे झोपेत असलेले बाळ दचकत नाही, असा समज त्यामागे आहे. नांदेड, माळेगाव व परिसरातून २० ते ५० हजार रुपये किमतीने गाढव विकत आणले जातात.
- श्रीकृष्ण कावनपुरे, वडगाव फत्तेपूर, ता. अचलपूर
गाढविणीच्या दुधात रोगप्रतिकार शक्ती अधिक असते. अस्थमा, सतत होणारी सर्दी, खोकला, ताप, संसर्गजन्य रोग, पोटाचे विकार, आतड्यांचे विकार, हृदयरोग टाळण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी दुधाचा अलीकडे वापर होतो, असे सांगितले जात असले तरी जिल्ह्यात विक्री होत नाही. ग्रामीण भागात स्नेहासंबंधावर दिले जात असल्याचे ऐकिवात आहे.
- विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अमरावती