अमरावती : विद्यार्थ्यांसाठीच्या शालेय पोषण आहार योजनेची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यंदाच्या उन्हाळी सुटीतील पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. मात्र, ही रक्कम कमी अन् खाते काढण्याचा खर्चच अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडणे आर्थिकदृष्ट्या डोकेदुखीचे ठरत असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासन निर्देशानुसार केवळ उन्हाळी सुटीतील पोषण आहारासाठी ही रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दरदिवशी प्रतिविद्यार्थी ०४.४८ रुपये दिले जातात. सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना दररोज ६.७१ रुपये दिले जातात. दोन महिन्यातील कामकाजाचे दिवस लक्षात घेतल्यास पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५६ रुपये ८० पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २४४ रुपये ८५ पैसे मिळणार आहेत. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. दरम्यान एवढ्या कमी रकमेसाठी पालकांना विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडावे लागणार आहे. बँकेत खाते काढताना खात्यात किमान ५०० ते १५०० रुपये शिल्लक असावे लागते. याहीपेक्षा बँक खाते उघडण्यासाठी ग्रामीण भागातील पालकांना आपली कामे सोडून जावे लागतात. बँकेत एकदा जाऊन कामे होत नसल्याने पालकांना वारंवार मजुरी पाडून हे काम करावे लागणार आहे. याआधी विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी अल्पसंख्याक सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीसाठी बँक खाते काढण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अनेक पालकांनी अशी खाती काढली नाही. ज्यांनी काढली त्यांच्या खात्यावर व्यवहार झाले नाहीत. खात्यात किमान शिल्लक नसल्याने अनेक खाती बंद पडली आहेत. काहींना दंडही ठोठावला आहे. शिक्षकांनी ही खाती उघडून घेतली असल्याने दंड पडल्यास शिक्षकांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. या आव्हानामुळे थेट रक्कम जमा करण्याची योजना मागे घेण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.
कोट
शालेय पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना नवे बँक खाते काढावे लागणार आहे. याकरिता गोरगरीब पालकांना पैस खर्च करावे लागणार आहे. पालकही याकरिता राजी होत नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पोषण आहाराचा पुरवठाच करावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केली आहे.
- राजेश सावरकर,
राज्य प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक समिती