अमरावती : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या कांतानगर येथील शासकीय बंगल्यातील चोरी प्रकरणामध्ये कर्तव्यात हयगय करणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर राखीव पोलीस निरीक्षक यांना नियंत्रण कक्षासोबत अटॅच करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी यासंदर्भात शनिवारी आदेश काढले.
कांतानगर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा शासकीय बंगला आहे. या शासकीय बंगल्यावर पाच पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात असतात. मात्र, त्यानंतरही न्यायाधीशांच्या शासकीय बंगल्यामध्ये चोरी करून चोरटे पसार झाल्याची धक्कादायक बाब ३० जून रोजी उघडकीस आली होती. बंगल्यातील एका खोलीत राहणाऱ्या न्यायालयीन शिपायाच्या पँटच्या खिशातील ३ हजार २०० रुपये लंपास करण्यात आले होते. विशेष म्हणजे, शासकीय बंगल्यावर पाच पोलीस कर्मचारी ड्युटीवर तैनात असल्यावरही मध्यरात्रीनंतर बंगल्यात शिरून चोरट्यांनी शिपायाच्या खोलीतून रोख लंपास केली होती. ही घटना उजेडात आल्यानंतर पोलीस यंत्रणा खळबडून जागी झाली होती. याप्रकरणी मिलिंद विश्वनाथ लव्हाळे (३२) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून काही सराईतांचीही चौकशी केली.
दरम्यान, सदर घटनेच्या वेळी बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करून बयाण नोंदविण्यात आले. त्यात ड्युटीवर तैनात पाच कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हयगय केल्याचे समोर आल्यावर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, शिवाय राखीव पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षासोबत अटॅच करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. यापूर्वीसुद्धा पोलीस आयुक्तांनी राजापेठ ठाण्याच्या डीबी स्कॉडमधील काही पोलीस कर्मचारी मुख्यालयाला अटॅच केले होते.