सीसीटीव्ही लागणार : विभागप्रमुखांवरही जबाबदारी लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बदलीचे आदेश फेटाळू लेखापरीक्षण विभागात तळ ठोकून बसलेल्या कनिष्ठ लिपिकाला सोमवारी तडकाफडकी ‘रिलिव्ह’ करण्यात आले. याशिवाय त्यांची बदली झाली असताना त्यांना बदलीस्थळी जाण्यासाठी कुणी कार्यमुक्त केले नाही, याबाबत जबाबदारी निश्चित केली जाईल. संबंधितांकडून खुलासा आल्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.‘बदली टाळून आॅडिटमध्ये ठिय्या’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ने आयुक्तांच्या आदेशांची झालेली अवमानना लोकदरबारात मांडली होती. त्याअनुषंगाने आयुक्त हेमंत पवार यांनी नीरज ठाकरे नामक कनिष्ठ लिपिकाला लेखापरीक्षण विभागातून अर्ध्या तासांत कार्यमुक्त करण्याचे आदेश सोमवारी दिलेत. आदेशाबरहुकूम ठाकरे यांना मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे यांना दुपारी कार्यमुक्त केले. ‘आॅडिट’मध्ये लागणार ‘सीसीटीव्ही’अमरावती : ठाकरे यांच्या रिक्त जागेवर अन्य कर्मचारी देण्याचे निर्देशही आयुक्तांनी जीएडीचे अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांना दिले आहेत. लेखापरीक्षण विभागात कार्यरत नीरज ठाकरे यांची तीनदा अन्य विभागात वा झोन कार्यालयात बदली करण्यात आली. त्यापेकी दोन आदेश जीएडीकडेही उपलब्ध आहेत. १० आॅगस्ट व ३ नोव्हेंबर २०१६ ला ठाकरे यांच्या बदलीचे आदेश आयुक्त हेमंत पवार यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. त्यावेळी त्यांची बदली अनुक्रमे जनसंपर्क व बडनेरा झोनमध्ये करण्यात आली होती. तत्पूर्वी मे महिन्यामध्येही त्यांची लेखापरीक्षण विभागातून बदली केल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, ठाकरे बदलीस्थळी रुजू झाले नाहीत. आपल्याला विभागप्रमुखांनी कार्यमुक्त केले नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यापार्श्वभूमिवर ‘लोकमत’ने ठवकरे यांच्याद्वारे झालेल्या प्रशासकीय अवहेलनेवर सोमवारी प्रकाशझोत टाकला. त्याची दखल घेत आयुक्तांनी मुख्य लेखापरीक्षकांसह मिसाळ यांचेकडून माहिती जाणून घेतली व ठाकरे यांना अर्ध्या तासांत कार्यमुक्त करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिलेत. याशिवाय ठाकरे बदलीनंतरही बदलीस्थळी रुजू झाले नाहीत, ही जबाबदारी नेमकी कुणाची, हे निश्चित करण्यासाठी विभागप्रमुखांकडून खुलासा मागविण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिलेत.अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रचंड आर्थिक घडामोडी चालणाऱ्या आॅडिट विभागात सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश सोमवारी आयुक्तांनी दिलेत. याविभागातील बंद सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी आतापर्यंत कुणीही पुढाकार घेतला नाही. मुख्य लेखापरीक्षकही याबाबत अनभिज्ञ आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना कॅमेरा सुरू असल्याची कुणकुण लागल्याने कॅमेऱ्याची दिशा बदलविण्यात आली. कॅमेऱ्यात केवळ कार्यालयाची भिंतच कशी दिसेल, याची तजविज करण्यात आली आहे. मात्र, येथे नवे सीसीटीव्ही लागणार असल्याने काही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आॅडिटमधील ‘तो’ कर्मचारी तासाभरात ‘रिलिव्ह’
By admin | Published: May 23, 2017 12:03 AM