अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून जनावरे चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना स्थानिक गुन्हे शाखेने १८ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यांनी तब्बल १४ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्या चोरांचे तीन साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक दोघांपैकी अ. जब्बार हा अकोल्याचा असून, तो अमरावतीला आल्याचे समजताच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या.
अब्दुल जब्बार अब्दुल कादर (२१, रा. अकोला) व अमीर खान नूर खान (३१, रा. अचलपूर) अशी अटक चोरांची नावे आहेत. जिल्ह्यातील जनावरे चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते. तपासात जनावरे चोरणारा सराईत चोर अब्दुल जब्बार अब्दुल कादर हा अमरावती शहरातील वालकट कम्पाउंड परिसरात आल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने त्याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने साथीदार अमीर खान नूर खान, अफजल खान उर्फ मुन्ना खान खलील खान, शेख रिहान ( तिघेही रा. अकोट फैल, अकोला) व विजय उर्फ लल्ला दीपक वानखडे (रा. अचलपूर) यांच्यासोबत केलेल्या तब्बल १४ गुन्ह्यांची कबुली दिली.
दोन चारचाकी वाहने जप्त
आरोपींकडून दोन चारचाकी वाहने असा ७ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, सय्यद अजमत, सुधीर बावने, नीलेश डांगोरे, अमोल केंद्रे, दिनेश कनोजिया, संजय गेठे यांनी केली. आरोपींकडून अन्य चोरींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.