छायाचित्रे आहेत.
फोटोओळ - १. वाहतूक पोलिसांसमोर राँगसाइड आलेल्या युवकाने युवतीच्या वाहनाला धडक दिल्यानंतरची स्थिती
२. पोलिसांनी त्या युवतीला रवाना केल्यावर अपघात घडवून आणणारा तो युवक पोलिसांसमोर पुन्हा असा राँगसाइड गेला.
अमरावती : असुरक्षित वाहतुकीचा शहरात झालेला सुळसुळाट आणि त्याकडे कॅज्युअलपणे बघण्याची वाहतूक पोलिसांची दृष्टी याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा आला.
मोर्शी मार्गालगत कार सजावटीच्या दुकानदारांचा व्यवसाय थेट रस्त्यावर चालतो. व्यवसायानुकूल रस्ते बघूनच व्यावसायिकांनी मोर्शी मार्गावर दुकाने थाटली आहेत. शिवाय सदर हद्द ज्या वाहतूक पोलिसांच्या आणि ठाण्याच्या अखत्यारित येते ते पोलीसही व्यावसायिकांना रस्त्यांचा वापर करू देण्यास अनुकूल असल्यामुळे त्या व्यवसायाला बळ मिळाले. मोर्शी मार्गावरील वाहतूक त्यामुळे जीवघेणी झाली आहे. रोजच अपघात घडत असतात. ‘लोकमत’ने हा मुद्दा लोकदरबारात उचलून धरल्यावर मंगळवारी वाहतूक पोलीस जिल्हा स्टेडियमसमोर पोहोचले. त्यांच्या उपस्थितीतच विरुद्ध दिशेने (राँगसाइड) वेगात आलेल्या दुचाकीचालकाने योग्य दिशेने जाणाऱ्या स्कूटीचालक मुलीला जोरदार धडक दिली. मोठ्ठा आवाज झाला. मुलगी रस्त्यावर धाडदिशी फेकली गेली. तिला उभे राहता येत नव्हते. पोलीस आणि काहींनी हात धरून तिला उचलले. एका वाहनाचा आधार घेऊन ती कशीबशी उभी राहिली खरी; परंतु तिला प्रचंड वेदना होत होत्या. पायाला गंभीर दुखापत झाली होती. चप्पलही घालता येत नव्हती. घाबरलेली होती. तक्रार करावी, न्याय मागावा, अशी त्या मुलीची मन:स्थिती नव्हती. तिच्या अधिकारांची तिला जाणीवही नसावी. काही वेळाने पोलिसांनी तिच्या पायात चप्पल घालून दिली, तिची स्कूटी तिच्या हाती दिली. एका पायाच्या भरवशावर कशीबशी ती स्कूटी चालवत निघून गेली.
या क्षणापर्यंत धडक देणारा मुलगा त्याच्या वाहनाची चाचपणी करीत थांबलेला होता. मुलगी गेल्यावर तेथे तैनात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशी काहीतरी बोलून तो तरुण पुन्हा राँगसाइड वाहनावर स्वार होऊन निघून गेला. पाेलिसांसमोर विरुद्ध दिशेने येऊन, अपघात घडवून, पोलिसांसमोरच पुन्हा विरुद्ध दिशेने वाहन नेले जात असेल तर अमरावती शहरात वाहतूक पोलिसांची नेमणूक कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय करायला हवे होते?
पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात घेणे. वाहन विरुद्ध दिशेने चालविण्यासाठी चालान देणे. अपघात घडवून आणण्यासाठी
गुन्हे नोंदविणे, अपघात घडविणारे वाहन ताब्यात घेणे. तक्रार द्यावयाची असल्यास अपघातग्रस्त मुलीला मदत करणे. उपचारासाठी जखमीला वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे. किमान कुटुंबियांना घडलेल्या अपघाताबाबत माहिती देणे.
पाेलिसांवर कारवाई का नाही?
वाहतूक नियंत्रणासाठी शहरभरात तैनात केलेले पोलीस खरेच वाहतूक नियंत्रित करतात की कसे, हे तपासणारी यंत्रणा निष्प्रभ आणि निष्क्रिय आहे. वाहतूक पोलिसांची अडचण उद्भवणार नाही, याची खात्री असल्यामुळेच थेट वर्दळीच्या रस्त्यांवर व्यवसाय थाटले गेले आहेत. थाटले जात आहेत. चार-दोन दुकानदारांच्या लाभासाठी हजारो, लाखो लोकांच्या जीविताशी जीवन-मृत्यूचा खेळ खेळला जातो. माेर्शी मार्गावरील उदाहरण येथे नमूद केले आहे. शहरभरात हेच चित्र आहे. वाहतूक नियंत्रण हे जर वाहूतक पाेलिसांचे कर्तव्य असेल तर ते पार न पाडणाऱ्या पोलिसांवर कारवाई का केली जाऊ नये.